पाण्यासाठी पुन्हा एल्गार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 02:02 IST2015-08-22T02:02:27+5:302015-08-22T02:02:27+5:30
बारामती तालुक्यातील लोणी भापकरसह २२ जिरायती गावांनी पुरंदर योजना कार्यान्वित करावी, चारा डेपो सुरू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी पुन्हा

पाण्यासाठी पुन्हा एल्गार!
लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणी भापकरसह २२ जिरायती गावांनी पुरंदर योजना कार्यान्वित करावी, चारा डेपो सुरू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आठ शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून लोणी पाटीवर उपोषणास प्रारंभ केल्याने या गावातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
५० वर्षे सत्तेत राहिलेल्यांनी वेळोवेळी आश्वासने दिली. शिवार मात्र तहानलेलाच राहिला. ‘अच्छे दिन’चे आशा दाखविणारे नवीन राज्यकर्ते तरी या भागाची तहान भागविणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.
हनुमंत भापकर, मुरलीधर ठोंबरे, विजय बारवकर, रावसाहेब चोरमले, तात्याराम जायपत्रे, मोहन जगदाळे, तानाजी कोळेकर, रमेश भापकरअशी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासह दारातील जित्रांबांना चारा आणायचा कोठून, यामुळे लोणी भापकर, मोरगाव, तरडोली, मासाळवाडी, पळशी, मुर्टी, मोढवे, कानाडवाडी, मुढाळे, सायंबाचीवाडी, माळवाडी, जळगाव क. प., बाबुर्डी, काऱ्हाटी, जळकेवाडी, चोपडज, भिलारेवाडी आदी गावांतील शेतकरी हतबल झाला आहे. सलग चार वर्षे पावसाने हुलकावणी दिल्याने या भागातील पिण्याचे पाणी व चाऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यातच पुरंदर योजना सुरू होऊन पाझर तलाव भरावेत, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने या गावांनी उपोषणाचे हत्यार उपसले असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
ज्या गावांना मोरगाव प्रादेशिकचे पाणी मिळते ते अपुरे व गढूळ आहे. त्यातून आजारांचे प्रमाण वाढत आहे. टँकरची संख्या अपुरी असल्याने वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याची व्यथा ग्रामस्थ मांडत आहेत. जुनी वैरण संपली, शेतात चाराच नाही. त्यामुळे दारातील जित्राबं जगवायची कशी, अशा विवंचनेत हा भाग सापडल्याचे चित्र आहे. पावसाने ओढ देताच वर्षानुवर्षे या भागात अशीच टंचाई स्थिती उद्भवत असल्याने अनेकांनी बागायती भाग किंवा शहराकडे स्थलांतर केले आहे.