अकरावी प्रवेशाची धांदल, २१ ऑगस्टला सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:59+5:302021-07-20T04:09:59+5:30

पुणे : राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

Eleventh admission rush, CET on 21st August | अकरावी प्रवेशाची धांदल, २१ ऑगस्टला सीईटी

अकरावी प्रवेशाची धांदल, २१ ऑगस्टला सीईटी

पुणे : राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना सीईटीसाठी येत्या २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर सीईटी येत्या २१ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असेल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, इंग्रजी, गणित (भाग १ व २), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व २) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विषयनिहाय २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून, वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सीईटी परीक्षा ‘ओएमआर शीट’च्या माध्यमातून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक परीक्षा केंद्र देण्यात जाईल. विद्यार्थ्याने अर्जात नमूद केलेला पत्ता विचारात घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दिले जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना माध्यम निवडणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

----------------------------

राज्य मंडळाने अकरावी ‘सीईटी’साठीचे विषय घटक सोमवारी प्रसिद्ध केले. परंतु, काही दिवसांपूर्वीच याच घटकांवरील आधारित सीईटीच्या तयारीचे पुस्तक बाजारात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यापूर्वीच विषय घटकांची माहिती प्रकाशकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या प्रक्रियेत काम करणाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे कोरोना काळात सीईटीच्या नावाखाली नफेखोरी करणाऱ्यांवर कारवाई होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

------------------------------------

Web Title: Eleventh admission rush, CET on 21st August