‘वीजपुरवठा खंडित होऊ देणार नाही!’
By Admin | Updated: June 9, 2014 05:17 IST2014-06-09T05:17:28+5:302014-06-09T05:17:28+5:30
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून येथील महावितरण विभाग सज्ज झाला असल्याची माहिती उपअभियंता संजय घोडके यांनी दिली.

‘वीजपुरवठा खंडित होऊ देणार नाही!’
देहूगाव : संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान काळात भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून येथील महावितरण विभाग सज्ज झाला असल्याची माहिती उपअभियंता संजय घोडके यांनी दिली.
सध्या देहूगावला चिखली येथील टेल्को सबस्टेशनमधून विद्युतपुरवठा केला जातो. यात्रा काळात विद्युत पुरवठा खंडित झाला, तर देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड फीडरमधून तातडीने विद्युतपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वीज पुरवठ्याच्या समस्या राहणार नाहीत, याची दक्षता महावितरण विभागाच्या वतीने घेण्यात येणार आहे.
यात्रा काळात अभियंता पेटकर, उपअभियंता संजय घोडके, कनिष्ठ अभियंता जयकुमार कथले हे अधिकारी व त्यांचे १८ कर्मचारी व खासगी ठेकेदाराचे कर्मचारी २४ तास उपलब्ध असतील. या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावातील वीजवाहक तारांना अडथळे ठरणारी झाडे छाटण्यात आली आहेत. ठिकठिकाणच्या वीजवाहक तारा ओढण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी डीपीना झाकण बसविण्यात येत आहेत. विकास आराखड्यांतर्गत भूमिगत वीजवाहक केबल टाकल्या आहेत. (वार्ताहर)