वीजवाहक खांब बनले मृत्यूचे सापळे
By Admin | Updated: February 9, 2017 03:12 IST2017-02-09T03:12:47+5:302017-02-09T03:12:47+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरचे खांब एका बाजूला झुकले आहेत

वीजवाहक खांब बनले मृत्यूचे सापळे
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरचे खांब एका बाजूला झुकले आहेत. वीजवाहक तारा शाळेच्या पत्र्यांवर लोंबकळल्याने हे खांब आता मृत्यूचे सापळे बनले आहेत.
चिखली गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेशेजारील ट्रान्सफॉर्मरच्या तारा शाळेच्या भिंतींवर व पत्र्यांवर टेकल्यामुळे वीजेचा प्रवाह चालू असताना या भिंती व पत्र्यांमध्ये वीजेचा शॉक उतरतो. यामुळे शाळेतील मुलांना व परिसरातील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन या परिसरामध्ये वावर करावा लागतो. या ट्रान्सफॉर्मरशेजारीच खेळाचे मैदान व या गावामध्ये येण्याजाण्याचा रस्ता असल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धोका आहे.
पावसाळ्यामध्येही या शाळेला पूर्णपणे शॉक येत असल्याची माहिती शिक्षकांनी ग्रामस्थांनी दिली. परिणामी विद्यार्थ्यांना दुसऱ्या खोल्यांमध्ये स्थलांतरीत करावे लागते. याबाबत चिखली येथील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी तक्रार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या ट्रान्सफॉर्मरमधून या परिसरातील वाड्यावस्त्यांना वीज पुरवठा केला जातो. या बरोबरच या भागातील बऱ्याच रोहित्रांचे खांबही मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. हे खांब केव्हाही कोसळण्याच्या परिस्थितीत आहेत. उन्हाळ्यामध्ये या खांबांचे काम न करता महावितरणला ऐन मुसळधार पडणाऱ्या पावसाळ्यात जाग येते. यावेळी या विद्युत प्रवाहात बिघाड झाल्याने कित्येक दिवस या भागातील आदिवासी जनतेला अंधारात रहावे लागते. सध्या उन्हाळ्यामध्ये गंजलेले खांब बदलण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. अतिधोकादायक असणाऱ्या चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी चिखलीचे सरपंच चिंतामण आठारी, साहेबराव भालेराव, संतोष भालेराव, —-गोबा देवस्थान ट्रस्ट, अध्यक्ष धर्मा आढारी, ग्रामपंचायत माजी सरपंच सीताराम उंडे व चिखली ग्रामस्थांनी केली आहे.