वीज गेली अन् उमेदवारीही!
By Admin | Updated: September 29, 2014 05:40 IST2014-09-29T05:40:32+5:302014-09-29T05:40:32+5:30
शहरात सध्या पुरेसा वीजपुरवठा होत असतानाही अचानक वीज गायब झाल्याने एका इच्छुकाला मोठा धक्का बसला.

वीज गेली अन् उमेदवारीही!
पुणे : शहरात सध्या पुरेसा वीजपुरवठा होत असतानाही अचानक वीज गायब झाल्याने एका इच्छुकाला मोठा धक्का बसला. ऐन वेळी वीज गेल्याने उमेदवारी अर्जासोबत द्यावयाचे प्रतिज्ञापत्र तयार न झाल्याने उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. हे इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. मात्र, कॉँग्रेसमधून आलेले दीपक मानकर यांना उमेदवारी देण्यासाठी ही चलाखी करण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे.
येथून काकडे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यांना ए-बी फॉर्मही देण्यात आला. अहमदनगरहून शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते पुण्यात आले. एक वाजता ए-बी फॉर्मसह उमेदवारी अर्जही भरला. वैयक्तिक माहिती असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. अर्ज भरण्याच्या मुदतीत त्यांना हे प्रतिज्ञापत्र सादर करता आले नाही. वीज गेल्याने प्रतिज्ञापत्र तयार करण्यास उशीर झाला, असे कारण त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांचा रोष टाळण्यासाठी राष्ट्रवादीने ही चलाखी केल्याची चर्चा आहे. काकडे यांची उमेदवारी अडचणीत आल्याचे सांगून दीपक मानकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मानकरांना उमेदवारीचा शब्द देऊन पक्षात प्रवेश देण्यात आला असल्याने पेच निर्माण झाला. कारण पुढे करून काकडे यांची उमेदवारी टाळली.