वीजबिलात प्रतियुनिट १ रुपया १८ पैसे
By Admin | Updated: January 30, 2017 02:43 IST2017-01-30T02:43:30+5:302017-01-30T02:43:30+5:30
चालू महिन्यापासून वीजबिलात वहन आकाराचा नव्याने समावेश करून प्रतियुनिट १ रुपया १८ पैसे वीजदरवाढ केल्याचा

वीजबिलात प्रतियुनिट १ रुपया १८ पैसे
बारामती : चालू महिन्यापासून वीजबिलात वहन आकाराचा नव्याने समावेश करून प्रतियुनिट १ रुपया १८ पैसे वीजदरवाढ केल्याचा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. तो चुकीचा व वीजग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने प्रथमच वीजदरातील अस्थिर आकारांची विभागणी केल्याने वहन आकार स्वतंत्रपणे दाखविण्यात आला आहे.
वीजदर निश्चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आहेत. त्यामुळे महावितरण वीजदर ठरवू शकत नाही, बदल करू शकत नाही. २६ जून २०१५च्या वीजदर आदेशापर्यंत वीजबिलात स्थिर आकार व अस्थिर आकार अशा दोन भागांतच आकारणी होत असे. ३ नोव्हेंबर २०१६च्या आयोगाच्या आदेशानुसार आता वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार अशा तीन भागांत आकारणी केली जात आहे. यांपैकी वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्याच अस्थिर आकाराचे दोन भाग आहेत. सदर बाबींचा विचार करता, वहन आकारामुळे ३५ ते ४० टक्के वीज दरवाढ झाली, हे म्हणणे चुकीचे आहे. विद्युत नियामक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाप्रमाणे घरगुती ग्राहकांच्या वीजदरात केवळ सरासरी १.३ टक्के इतकीच वाढ झालेली आहे. हे दर १ नोव्हेंबर २०१६पासून लागू होणार असून नव्या वीजदरात वहन आकार प्रथमच वेगळा दाखविला आहे.
उदा. पहिल्या १०० युनिटसाठी असलेला घरगुती वीजदर पाहिल्यास वीज आकार २.९८ रुपये अधिक वहन आकार १.१८ रुपये, असा एकूण ४.१६ रुपये अस्थिर वीज आकार आहे. यातील वहन आकार नवीन नाही, तर तो वीजदराचाच एक भाग आहे. त्यामुळे वहन आकाराच्या नावाखाली महावितरणने दरवाढ केल्याचा सोशल मीडियातून फिरणारा संदेश चुकीचा आहे. तसेच, वीजग्राहकांना संभ्रमित करणारा आहे. (वार्ताहर)