पुणे : निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणुकांच्या अनुषंगाने वाहन तपासणीवर भर देण्यात आला असून सर्वत्र काटेकोरपण आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु आहे. पर्वती मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नेमलेल्या स्थिर पथक क्रमांक पाचच्या पथकाने बुधवारी सकाळी पाच लाख १२ हजार २०० रुपयांची रोकड पकडली. ही रोकड एका लेबर कॉन्ट्रॅक्टरची असल्याची माहिती पथक प्रमुख आशिष सुपनार यांनी दिली. पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती मतदार संघामध्ये चार भरारी आणि पाच स्थिर पथके तैनात केली आहे. मद्य व पैशांच्या वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. स्थिर पथक क्रमांक पाचचे प्रमुख आशिष सुपनार, विनोद सूर्यवंशी, पोलीस हवालदार संजय माठेकर, इफ्तिकार शेख, पोलीस नाईक रुपाली चांदगुडे, दोडके तसेच भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव आदी गंगाधाम चौकामध्ये वाहन तपासणी करीत होते. पथकाने केलेल्या नाकाबंदीदरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची मोटार रस्त्याने जाताना दिसली. ही मोटार आई माता मंदिराच्या दिशेने खिंडीमधील रस्त्याने जात होती. संशय आल्याने आयोगाच्या पथकाने मोटारीला थांबण्याचा इशारा केला. परंतू, ही मोटार थांबली नाही. पथकाच्या कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखत ही मोटार काही फुटांवरच अडविली. मोटारीची तपासणी केली असता गाडीत पाच लाख १२ हजार २०० रुपयांची रोकड मिळून आली. हे पैसे कुठून आणले, कुठे घेऊन जात आहेत. याबाबतची कागदपत्र अथवा पुरावे सादर न करता आल्याने पंचनामा केला असून ही रोकड पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.