जिल्हा दूध संघात ८ जागांंसाठी निवडणूक
By Admin | Updated: June 10, 2015 05:44 IST2015-06-10T05:44:44+5:302015-06-10T05:44:44+5:30
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १६ जागांपैकी ८ सर्वसाधारण मतदारसंघांतून उमेदवार बिनविरोध झाल्याने आता उर्वरित ८ जागांंसाठी अकरा तालुक्यांत निवडणूक होत आहे.

जिल्हा दूध संघात ८ जागांंसाठी निवडणूक
पुणे : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १६ जागांपैकी ८ सर्वसाधारण मतदारसंघांतून उमेदवार बिनविरोध झाल्याने आता उर्वरित ८ जागांंसाठी अकरा तालुक्यांत निवडणूक होत असून उद्या सकाळी अकरा वाजता अंतिम उमेदवार यादी जाहिर होणार आहे. २१ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.
आज ९ जून रोजी माघारीची शेवटची मुदत होती. मुळशीतून रामभाऊ ठोंबरे, मावळमधून बाळासाहेब नेवाळे, हवेलीतून गोपाळ म्हस्के तसेच वेल्हा तालुक्यातून भगवान पासलकर व पुरंदरमधून संदीप उर्फ गंगाराम जगदाळे तसेच जुन्नरमधून बाळासाहेब खिलारी व खेडमधून चंद्रशेखर शेटे यांची बिनविरोध निवड झाली. आंबेगाव मतदारसंघातून विष्णू हिंगे यांचीही सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवड झाली.
शिरुरमधून बाळासाहेब ढमढेरे आणि रेखा मंगलदास बांदल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. भोरमधून सर्वसाधारण गटातून अशोक थोपटे यांच्याविरुध्द अर्ज दाखल केलेले व आज माघार न घेतलेले दिलीप थोपटे यांच्यात लढत होत आहे. तर याच प्रवर्गातून दौंडमध्ये रामदास दिवेकर व नारायण फडके यांच्यात लढत आहे.
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अरविंद मोरमारे यांनी दिलीप मोहिते गटाच्या लक्ष्मण तिटकारे यांच्या विरोधात बंडखोरी केली असून भटक्या विमुक्त जमाती मतदारसंघातून रामभाऊ टुले व जीवन तांबे यांच्यात लढत आहे. अन्य मागास प्रवर्गातून बाळासाहेब भुजबळ व दौलत लोखंडे लढत आहेत. महिला राखीव मतदारसंघात वैशाली गोपाळगडे, केशरताई पवार व नंदिनी देशमुख यांच्यात लढत होणार आहे.
आठ ते सायंकाळी पाच पर्यंत मतदान
२१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत मतदान होत असून आंबेगावमध्ये अवसरी दूध शीतकरण केंद्र, भोरमध्ये दूध शीतकरण केंद्र, दौंडमध्ये वरवंड जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र असणार आहे. हवेलीचे मतदान कात्रज डेअरीतच होणार असून जुन्नरमध्ये जीवन शिक्षण मंदिर, खेड तालुक्यात वाडा रोडवरील महात्मा गांधी विद्यालय, मावळात नायगाव दूध शीतकरण केंद्र, शिरुरमध्ये कोंढापुरी दूध शीतकरण केंद्र,वेल्हा मध्ये जिल्हा परिषद शाळा, पुरंदरमध्ये सासवडमधील पुरंदर हायस्कूल, मुळशीत पौड येथील जिल्हा बँकेची शाखा अशा ठिकाणी मतदान केंद्रे आहेत.