Pune Rave Party: पुणे शहरातील खराडी परिसरातील ड्रग्ज पार्टीवर पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे छापा टाकत पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या पार्टीचे आयोजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर याने केले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी पोलिसांनी हॉटेलमधून मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त केले होते. या कारवाईनंतर वैद्यकीय चाचणीच्या अहवालावरुन एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीतल्या छापेमारीदरम्यान अटक केली. यानंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील हडपसर भागातील घरावरही छापा टाकला होता. नाथाभाऊंच्या जावयाला रेव्ह पार्टीदरम्यान रंगेहात पकडल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली. प्रांजल खेवलकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याआधी पोलिसांनी अटक सर्वांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीतून प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे अहवालात समोर आल्याचे म्हटलं जात आहे. अशातच एकनाथ खडसे यांनी ड्रग्ज चाचणीचा अहवाल यायला वेळ का लागतो आहे असा सवाल केला.
"डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झाले होते. त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉ. खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे," असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.