पुण्यात ट्रेलरची आठ वाहनांना धडक; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:16+5:302020-12-02T04:09:16+5:30

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच चारचाकी, ...

Eight vehicles hit by trailer in Pune; Three killed | पुण्यात ट्रेलरची आठ वाहनांना धडक; तीन ठार

पुण्यात ट्रेलरची आठ वाहनांना धडक; तीन ठार

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच चारचाकी, दोन दुचाकी व एक रिक्षा अशा आठ वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. यात तिघे ठार झाले. यानंतर ट्रकला आग लागली.

अपघातात रिक्षाचालक राजेंद्र मुरलीधर गाडवे (वय ६५, रा. आंबेगाव खुर्द) व प्रशांत गोरे (वय ३२, रा. उस्मानाबाद) व निखिल विलास आवटे (वय २५, रा. कात्रज) या दाेन दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. रिक्षामध्ये बसलेल्या तीन मुली गंभीर जखमी असून, चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास २२ चाकी ट्रेलर सातारा बाजूकडून ४१ टन लोखंड घेऊन मुंबई बाजूकडे जात होता. भूमकर पुलाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे चाललेल्या आठ वाहनांना एका पाठोपाठ एक अशी जोरदार धडक दिली. तसेच त्यानंतर ट्रेलरची पुलावरील कठड्याला धडक बसल्याने ट्रेलरने पेट घेतला. माहिती मिळताच पीएमआरडी व पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रेलरने धडक दिल्याने रिक्षाचालक बाहेर पडले. तेव्हा बाजूने जाणाऱ्या वाहनांनी त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात कारमधील अनेक जण अडकून पडले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रेलर चालक प्रेमराज बिष्णोई ( वय २५, रा. जोधपूर, राजस्थान) याला नागरिकांनी पकडून जोरदार मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले.

Web Title: Eight vehicles hit by trailer in Pune; Three killed