कोरोनाविरोधात बीसीजी लसीची परिणामकारकता अद्याप संशोधनात्मक पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:07+5:302021-03-17T04:13:07+5:30
बीसीजीवर अवलंबून राहणे चुकीचे : लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल पुणे : सर्व नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होईपर्यंत बीसीजी लस ...

कोरोनाविरोधात बीसीजी लसीची परिणामकारकता अद्याप संशोधनात्मक पातळीवर
बीसीजीवर अवलंबून राहणे चुकीचे : लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल
पुणे : सर्व नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होईपर्यंत बीसीजी लस घेता येईल, असा सूर सध्या ऐकायला मिळत आहे. मात्र, बीसीजी लस कोरोनाविरोधात प्रभावी ठरते का, याबाबतचे संशोधन अद्याप सुरू आहे. मानवी चाचण्यांचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. याउलट, कोरोनावरील लसींची परिणामकारकता चाचण्यांमधून सिद्ध झाली आहे. लस पुढील एक-दोन महिन्यांत सर्वांसाठी खुली होऊ शकते. शिवाय, कोरोनावरील लस घेण्याच्या महिनाभर आधी इतर कोणतीही लस घेता येत नाही. त्यामुळे बीसीजी लस घेण्यावर अवलंबून राहण्यापेक्षा सध्या तरी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे मत संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांनी वर्तवले आहे.
कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीला बीसीजी लसीबाबत बरेच कयास बांधण्यात आले. भारतीयांमध्ये लहानपणीच बीसीजी बुस्टर डोस दिला जात असल्याने आपल्याकडे कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात आणि कमी वेगाने होईल, असाही अंदाज बांधण्यात आला. मात्र, कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने ही समीकरणे चुकीची ठरवली. सध्या ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरू आहे. ही संख्या साधारण ३० कोटी आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बीसीजी बुस्टर लस कोरोनाविरोधात प्रभावी ठरु शकेल, अशी शक्यता काही डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
सिरम इन्स्टिट्यूटची बीसीजी लस कोरोनाविरोधात प्रभावी ठरणार का, याबाबत अजूनही निष्कर्ष संशोधनात्मक पातळीवर सुरू आहेत. पारंपरिक बीसीजी लसीमध्ये काही सुधारणा करण्यात येत आहेत. परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी संशोधकांकडून टी सेल्स, बी सेल्स, व्हाइट ब्लड सेल्स आणि डेंड्रीटिक सेल्सबाबत अभ्यास केला जात आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात ६० ते ८० या वयोगटातील स्वयंसेवकांवर बीसीजी लसीची चाचणी घेण्यात आली होती. लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढत असल्याचे या अभ्यासातून सिद्ध झाले होते.
--
बीसीजी लसीमुळे सर्वसमावेशक रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे या लसीमुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. मात्र, बीसीजी कोरोनाविरोधात प्रभावी आहे का, याबाबतच्या चाचण्या अद्याप सुरू आहेत. त्यांचे निष्कर्ष समोर आलेले नाहीत. लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम समोर येतात का, हे पाहण्यासाठी मानवी चाचणी घेतली जाते. बीसीजी लस दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील, हे आताच सांगता येणार नाही. जागतिक स्तरावरील आरोग्य संघटनेने सुचवल्याशिवाय लस वापरता येणार नाही. शिवाय, कोरोनावरील लस घेण्याआधी किमान एक महिना इतर कोणतीही लस घेता येणार नाही. कोरोनावरील लस आपल्याकडे आता उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील एक-दोन महिन्यांमध्ये लस सर्वानाच उपलब्ध होईल.
- डॉ. भारत पुरंदरे, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल
--
बीसीजी लस लहानपणी घेतली जात असल्याने भारतात कोरोनाचा प्रभाव कमी राहील, असा अंदाज कालांतराने फोल ठरला. बीसीजीबाबत आपल्या हातात सध्या ठोस निष्कर्ष नाहीत. त्यामुळे बीसीजी द्यावी की नाही हा मुद्दा गौण ठरतो. त्यापेक्षा शासनाने सध्याच्या लसीकरणाची गती वाढवणे आवश्यक आहे.
१४ ते ४४ या वयोगटातील बहुतांश लोकांना सहव्याधी नाहीत. त्यांच्यामध्ये कोरोना गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. नोंदणीमध्ये रुग्णालयांचा खूप वेळ जातो. त्यामुळे एका दिवसात २०० जणांनाच लस देता येते. शासनाने लसीकरण केंद्रे वाढवली किंवा प्रक्रिया सोपी केली तर लसीकरणाचा वेग वाढू शकेल. ४५ वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लसीकरण उपलब्ध करून दिल्यास रुग्णांचे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी होईल.
- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्य आजारतज्ज्ञ, नोबेल हॉस्पिटल