शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: March 20, 2015 23:03 IST2015-03-20T23:03:10+5:302015-03-20T23:03:10+5:30
पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा मृत्यू
बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. सध्या ते बारामती शहरात वास्तव्यास होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दोडके हे नुकत्याच संपलेल्या दहावी माध्यमिक परीक्षेचे बारामती विभागाचे परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहत होते. त्यांना शनिवारी (दि. १४) थंडी-तापाचा त्रास होत असल्याने सांगवी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तेव्हा टायफायड झाल्याचे निदान करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर उपचारांनतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, रविवारी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर, त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.१८) त्यांना स्वाइन फ्लू, न्यूमोनिया,किडनी निकामी झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
परीक्षेमुळे टाळले उपचार
के . एस. दोडके हे दहावी परीक्षेसाठी बारामती विभागाचे परीक्षा नियंत्रक होते. त्यामुळे १३ केंद्रांतील विद्यार्थ्यांची त्यांच्यावर जबाबदारी होती. या दरम्यान परीक्षा सुरू असल्याने शारीरिक त्रास जाणवूनदेखील त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर स्वाइन फ्लू आजाराने गंभीर स्वरूप धारण केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी पंचायत समिती परिसरात चर्चा होती.
बारामती पंचायत समितीती श्रद्धांजली
बारामती पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी दोडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सकाळी दोडके यांच्या मृत्यूची बातमी पंचायत समिती कार्यालयात समजली. त्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे अचानक झालेल्या दोडके यांच्या मृत्यूची, मनमिळावू स्वभवाची या ठिकाणी दिवसभर चर्चा होती.