भाजपाच्या उमेदवारनिवडीला गटबाजीचे ग्रहण
By Admin | Updated: January 31, 2017 04:48 IST2017-01-31T04:48:38+5:302017-01-31T04:48:38+5:30
पुणे महापालिकेवर झेंडा फडकाविण्यासाठी उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला अंतर्गत मतभेदांचा अडथळा येऊ लागला आहे. अर्ज भरण्यास शेवटचे काही दिवस उरलेले

भाजपाच्या उमेदवारनिवडीला गटबाजीचे ग्रहण
पुणे : पुणे महापालिकेवर झेंडा फडकाविण्यासाठी उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला अंतर्गत मतभेदांचा अडथळा येऊ लागला आहे. अर्ज भरण्यास शेवटचे काही दिवस उरलेले असताना गटबाजीच्या ग्रहणामुळे उमेदवारांची निवड रखडली आहे. याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर झाला आहे.
वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील गटतट विसरून निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम उमेदवार देण्याचे आवाहन केले होते. परंतु, महापालिकेची सत्ता जणू काही आलीच आहे आणि त्यासाठी लॉबींग करण्यासाठी नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी उमेदवार निवडीपासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे एकमेकांच्या कार्यकर्त्यांना ओढायचे प्रयत्न सुरू असून त्यातून अंतिम उमेदवारयादी तयार होण्यास विलंब लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युतीची चर्चा होती. मात्र, ती आता पूर्णपणे संपली आहे. त्याअगोदरपासूनच स्थानिक पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक हे आमदार यामध्ये सहभागी आहेत. दीर्घ काळपर्यंत चाललेल्या या बैठकांमध्ये काही प्रभागांवर एकमत झाले. प्रामुख्याने कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये एकमत होण्यास अडचण आली नाही. मात्र, कोथरुड, कसबा आणि पर्वती या भाजपासाठी महत्त्वाच्या मतदारसंघात एकमत होईनासे झाले आहे. यामागे येथील नेत्यांमधील अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जात आहे. आपल्या कार्यकर्त्यांना घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मागील दोन महिन्यापासून भाजपाने पक्षप्रवेशाचा बार उडवून दिला होता. त्यातून पालकमंत्री
गिरीश बापट, खासदार संजय काकडे यांच्यात वाद झाले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी परस्परांशी जूळवूनही घेतले. त्यानंतरही काही प्रवेश करून घेण्यात आले. अनेक प्रभागांमध्ये तेथील अन्य पक्षांच्या नगरसेवकांना पक्षात प्रवेश
दिला आहे. या काळात भाजपाचे शहरातील खासदार आणि आमदार आमदार शांत होते. त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नव्हती. आता ऐन तिकीटवाटपाच्या वेळी हे सर्व जण सर्वच आमदार सक्रिय झाले आहेत. भाजपाच्या कोअर कमिटीच्या रविवारी रात्री झालेल्या बैठकीत यावरून नेत्यांमध्ये बरीच वादावादी झाल्याचे समजते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यात आमदारांनी बाहेरून आलेल्या काही जणांना उमेदवारी देण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्याऐवजी तेथील स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह काही आमदारांनी धरला. त्यातील बहुतेक जण त्यात्या आमदारांचे समर्थक कार्यकर्ते आहेत. भाजपातील गटातटाचे राजकारणही यामागे आहे. पालिकेत आता आपली सत्ता आलीच, अशी भाजपाच्या वरिष्ठांपासून ते साध्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाची खात्री झाली आहे. त्यातूनच पालिकेत आपले वर्चस्व असावे, अशा हेतूने नगरसेवकांचा गट जमविण्याचा प्रयत्न आतापासूनच केला जात आहे. प्रत्येक आमदार त्यासाठीच सक्रिय झाला आहे. कोअर कमिटीच्या बैठकीतील आमदारांचा पवित्रा पाहून बापट थक्क झाले असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जावडेकरही बैठकीतून निघून गेले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे भाजपाच्या यादीस विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.
(प्रतिनिधी)
उमेदवार यादीसाठी आणखी प्रतीक्षाच
१भाजपाच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी सोमवारी दुपारी केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आमदारांच्या बैठका झाल्या. त्यानंतर रात्री उशिरा कार्ड कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये अखेर एकमत झालेल्या नावांची यादी प्रदेशपातळीवर पाठविली जाणार आहे.
२मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या यादीला हिरवा कंदील दाखविल्यानंतरच भाजपाची पहिली यादी जाहीर होईल. काही प्रभागांमधील नावांवर कार्ड कमिटीच्या सदस्यांचे एकमत होत नव्हते, त्याचबरोबर काही विद्यमान नगरसेवकांचे नाव यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर तुमचे उमेदवारांच्या नावांवर एकमत करा; अन्यथा आम्ही निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पुन्हा कार्ड कमिटीच्या बैठका घेऊन उमेदवारांच्या नावांचा फेरविचार करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीसाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.