‘इको सेन्सेटिव्ह झोन’ला २२ गावांचा विरोध
By Admin | Updated: November 5, 2015 02:12 IST2015-11-05T02:12:03+5:302015-11-05T02:12:03+5:30
‘इको सेन्सेटिव्ह झोन’ला खेड तालुक्यातील समाविष्ट गावांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात झालेल्या जनसुनावण्यांमध्ये सर्व २२ गावांतील ग्रामस्थांनी एकमुखाने त्याविरोधात ठराव केले.

‘इको सेन्सेटिव्ह झोन’ला २२ गावांचा विरोध
राजगुरुनगर : ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ला खेड तालुक्यातील समाविष्ट गावांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात झालेल्या जनसुनावण्यांमध्ये सर्व २२ गावांतील ग्रामस्थांनी एकमुखाने त्याविरोधात ठराव केले.
तहसीलदारांच्या आदेशानुसार या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २२ गावांमध्ये नुकत्याच जनसुनावण्या घेण्यात आल्या. महसूल कर्मचारी, ग्रामसेवक आणि वनखात्याचे कर्मचारी उपस्थित होते. या झोनमुळे खाणकाम, बांधकाम आणि शेतीच्या काही कामांना बंधने येतील, असे गावकऱ्यांना वाटते म्हणून त्यांनी विरोध केला आहे. या झोनमध्ये शासकीय जमिनी घ्याव्यात; मात्र खासगी जमिनी घेऊ नयेत, असे मत ग्रामस्थांनी मांडले.
पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधील जैववैविध्य जपले जावे, यासाठी शासनाने ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अहवालानुसार पश्चिम घाटातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतील काही भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अर्थात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील काही गावांचा समावेश यात आहे. या निर्णयानुसार वृक्षतोड, खाणकाम , मोठे बांधकाम इत्यादी गोष्टींवर निर्बंध आणले आहेत. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमधील समाविष्ट गावांनी या झोनला विरोध केला आहे. आता खेड तालुक्यातही विरोधाचे सूर उमटू लागले आहेत.
दरम्यान, खेड तालुक्यातील २२ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’मध्ये घेतली असून, ती सर्व रद्द करावीत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मंगल अरुण चांभारे यांनी खेड उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. (वार्ताहर)
- खेड तालुक्यातील भोरगिरी, भिवेगाव, कारकुडी, मंदोशी, नायफड, टोकावडे, आव्हाट, भोमाळे , शिरगाव, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, खरपुड, विहांम, वांद्रा, तोरणे खुर्द, आढे, आंभू , खरवली, वेल्हावळे, गडद, पाळू या गावांचा समावेश या झोनमध्ये करण्यात आला आहे. या झोनच्या जाचक अटींमुळे त्या गावांचा विकास ठप्प होणार आहे, असे चांभारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या गावांमधील आदिवासी लोक जंगलातील हिरडा, करवंदे, जांभूळ, मोहाची फुले, रानभाज्या आणि मध गोळा करून उपजीविका करतात. त्यांच्या या साधनांवर या झोनमुळे प्रतिबंध येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. विकासकामे आणि शेतीविषयक कामे करताना अडथळे येतील, म्हणून आमचा यास विरोध असून हा झोन रद्द करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.