दौंडचा पूर्व भाग ऐन दिवाळीत अंधारात
By Admin | Updated: November 8, 2015 02:59 IST2015-11-08T02:59:36+5:302015-11-08T02:59:36+5:30
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी

दौंडचा पूर्व भाग ऐन दिवाळीत अंधारात
राजेगाव : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी, स्वामी चिंचोली, नंदादेवी, रावणगाव, राजेगाव व खानवटे या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे बुधवारपासून ही गावे अंधारात आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामस्थांची धांदल उडाली आहे. विजेअभावी पाणी योजना बंद पडल्याने, या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच, येथील व्यवसायही ठप्प झाले आहेत.
तात्पुरत्या स्वरूपात ५ एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्याचे काम शुक्रवारी रात्री सुरू झाले होते. परंतु, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्यास किमान १0 - १२ दिवस तरी लागणार असल्याने, पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार नसल्याने पूर्ण दिवाळी सणात विजेचा तुटवडा जाणवणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली. याबाबत दौंड महावितरणचे उपअभियंता अतुल चव्हाण म्हणाले की, रावणगाव सबस्टेशनची चाचणी शुक्रवारी (दि. ६) घेतली आहे. बुधवार-गुरुवारपर्यंत रावणगावचे सबस्टेशन चालू होईल. तसेच, भिगवण सबस्टेशन येथील ५ एमव्हीएचा (मेगा व्होल्ट अॅम्पिअर) शनिवारी रात्रीपर्यंत बसून टेस्टिंग केली जाईल.
रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरू होईल. १0 एमव्हीएचा ट्रान्सफार्मर बसायला ८ ते ९ दिवस लागतील. नंतर पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता येईल.
खडकीचे सरपंच किरण काळे म्हणाले की, रावणगाव येथील सबस्टेशन लवकरात लवकर सुरू करून, या भागातील नागरिकांना न्याय द्यावा. या भागातील गावांना दोन विभागांच्या घोळामुळे भिगवण येथील महावितरणच्या सबस्टेशनला फोन केल्यास, ‘तुमच्या विभागाला (केडगाव) विचारा’ अशी उडवा-उडवीची उत्तरे मिळतात.
हद्दीच्या वादात ग्रामस्थांचे हाल
दौंड तालुक्यातील खडकी, रावणगाव, नंदादेवी, स्वामी-चिंचोली, राजेगाव व खानवटे ही गावे भिगवण सबस्टेशनंतर्गत बारामती विभागाच्या अधिपत्याखाली येतात, तर प्रत्यक्षात या गावांची बिलिंग केडगाव विभागांतर्गत केले जाते. त्यामुळे भिगवण सबस्टेशन येथे दाद मागितले असता, ‘तुमच्या तालुक्यात चौकशी करा’ असे उत्तर मिळते, तर केडगाव विभागाला माहिती मागितली, तर ‘भिगवणला फोन करा’ असे सांगितले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न
नेहमीच पडतो.