कमावत्या व्यक्ती गेल्याने कुटुंबांची होतेय परवड

By Admin | Updated: March 15, 2015 00:40 IST2015-03-15T00:40:24+5:302015-03-15T00:40:24+5:30

जवळपास सर्व जण ३० ते ५५ वयोगटातील असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्यांवरच संकट आल्याने कुटुंबाची परवड होत आहे.

The earnings of the earning person | कमावत्या व्यक्ती गेल्याने कुटुंबांची होतेय परवड

कमावत्या व्यक्ती गेल्याने कुटुंबांची होतेय परवड

पिंपरी : शहरात मागील दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे २० नागरिकांचा मुत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये जवळपास सर्व जण ३० ते ५५ वयोगटातील असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्यांवरच संकट आल्याने कुटुंबाची परवड होत आहे. त्यातच स्वाइन फ्लूने ग्रासल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी पैसा खर्च झाल्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.
२० वर्षांच्या आतील एका मुलीचा समावेश आहे. सहा जण ३० ते ४० या वयोगटातील आहेत. ४ जण ४० ते ५० या वयोगटातील, तर तीन रुग्ण ५० ते ६० या वयोगटातील आहेत. ६०पेक्षा जास्त वयाचे दोन जण आहेत. शहरामध्ये स्वाइन फ्लूची लागण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून झाली. त्यामध्ये २१ जानेवारी रोजी पिंपळे गुरव येथील व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी स्वाइन फ्लूची तीव्रता पाहून उपाययोजना केल्या असत्या, तर इतर काही नागरिकांचे प्राण तरी वाचले असते.
१७ फेब्रुवारी रोजी निशांत कारखानीस (वय ३४) यांचा मृत्यू झाला. ते अभियंते म्हणून कंपनीत काम करत होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि सात महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. महालिंगम अलिमुत्ता (वय ३८) यांचाही स्वाइन फ्लूनेच बळी घेतला. त्यांच्या मागे पत्नी, ७ वर्षांचा मुलगा, लहान भाऊ, आई-वडील असे कुंटुंब आहे. त्यामध्ये कुटुंबाची मुख्य जबाबदारी ही महालिंगम यांच्यावरच होती. ५ मार्च रोजी प्रवीण बोऱ्हाडे (वय ३६) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. ते प्राध्यापक असल्याने कुटुंबाचा भार त्यांच्यावरच होता.
शिवाजी मदे (वय ४४) यांचा ११ मार्च रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आई मुक्ताबाई यांचाही मृत्यू झाला. कुटुंबातील मुख्य व्यक्ती जाणे म्हणजे ते पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्यासारखे आहे. त्यांचा मुख्य आधारच या आजाराने हिरावून घेतल्यामुळे आर्थिक गरजा आणि जबाबदारी कोण पेलणार? असा प्रश्न उभा आहे. (प्रतिनिधी)

४वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस व दर्जेदार मास्क दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. येथे सतत गर्दी असते. सर्व विभागांतील कर्मचारी साधा मास्क व रुमाल लावून बसलेले असतात. त्यांना एन ९५ मास्क देण्यात आलेले नाहीत.

४स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीच्या १५० बाटल्या उपलब्ध आहेत. यामुळे ही लस कोणाला द्यायची, हा प्रश्न निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना दर्जेदार मास्क पुरवावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

४ २१ जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत गेली. जानेवारीमध्ये दोन बळी गेले. फेब्रुवारीमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. त्यातच मार्चमध्ये आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. त्याचे भयानक स्वरूप पाहायला मिळत आहे.

शासनाकडून आम्हाला सध्या स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक १५० बाटल्या उपलब्ध आहेत. टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध झाल्यानंतर त्या आम्ही प्राधान्यक्रम ठरवून देऊ. कर्मचारीवर्गाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास आम्ही टॅमिफ्लू देणे सुरू केले आहे. - डॉ. किशोर गुजर, उपवैद्यकीय अधीक्षक

Web Title: The earnings of the earning person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.