दुर्गसंवर्धन समिती कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:06 IST2017-08-12T03:06:39+5:302017-08-12T03:06:39+5:30
हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेले राज्यातील गडकोट आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने राज्य शासनाने २०१५ साली दुर्गसंवर्धन समितीची स्थापना केली. सुरुवातीचे दोन वर्षे या समितीचे कामकाज सुरळीत सुरू होते.

दुर्गसंवर्धन समिती कागदावरच!
अभिजित कोळपे
पुणे : हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेले राज्यातील गडकोट आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने राज्य शासनाने २०१५ साली दुर्गसंवर्धन समितीची स्थापना केली. सुरुवातीचे दोन वर्षे या समितीचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून राज्याच्या पुरातत्त्व विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने राज्याची दुर्गसंवर्धन समिती फक्त कागदावरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किल्ले संवर्धनाचे कामही ठप्प असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
३० मार्च २०१५ साली राज्य दुर्गसंवर्धन समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष हे राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. (निनाद बेडेकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.) तसेच दुर्गसंवर्धनाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य करणाºया हृषीकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वि. रा. पाटील,
प्र. के. घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर व संकेत कुलकर्णी असे इतर दहा सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. या समितीचा कालावधी एक-एक वर्षाचा ठरविण्यात आला आहे.
२०१५ आणि २०१६ या दोन्ही वर्षी चांगले काम केल्याने समितीला मुदतवाढ दिली होती. दोन वर्षे हे काम सुरळीतपणे सुरू होते. मात्र चालू वर्षी २०१७ ला मात्र प्रमुख अधिकारी नसल्याचे कारण देत मागील सहा महिन्यांपासून या समितीने दिलेला मसुदा धूळखात पडून आहे. तसेच गड, किल्ल्यांच्या संंवर्धनाचे कामही ठप्प आहे. दोन वर्षांत या समितीच्या फक्त तीन बैठका झाल्या आहेत. प्रथम बैठक १९ आॅक्टोबर २०१६, तर दुसरी बैठक २ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली. चालू वर्षी १४ मार्च २०१७ ला शेवटची बैठक झाली. त्यानंतर या समितीचा कालावधी पूर्ण झाला.
मागील समितीमध्ये मी प्रमुख मार्गदर्शक होतो. त्यावेळी आम्ही समितीचा वर्षभरात करावयाचा मसुदा दिला आहे. त्यावर किती काम झाले. तसेच नवीन समितीबाबत कोणताही अध्यादेश किंवा होणाºया बैठकीसंबंधात मला अजून कोणत्याही (पत्र किंवा फोन) प्रकारचा निरोप आलेला नाही. त्यामुळे या समितीबाबत सद्यस्थिती काय आहे. याबाबत काहीच सांगता येणार नाही. राज्याच्या पुरातत्त्व विभागातर्फे कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत.
- पांडुरंग बलकवडे,
प्रमुख मार्गदर्शक, दुर्गसंवर्धन समिती
मागील वर्षी आम्ही मुंबईला बैठकीला नियमित जात होतो. मात्र या वर्षी दुर्गसंवर्धन समिती अस्तित्त्वात आहे की नाही, याबाबत काहीच कल्पना नाही. आम्ही दिलेल्या मसुद्यावर काय काम झाले, त्याबाबतही राज्य पुरातत्त्व विभागाकडून आम्हाला काहीच कळविले जात नाही.
- प्र. के. घाणेकर,
सदस्य, दुर्गसंवर्धन समिती
मागील काही महिन्यांपासून राज्य पुरातत्त्व विभागाला कोणी प्रमुख अधिकारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे या समितीचे कामकाज ठप्प होते. मात्र नुकतेच राज्य पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखपदी तेजस गर्गे यांची निवड झाली आहे. त्यामुळे या महिन्याच्या मध्यावर बैठक होणार असल्याचा निरोप मला मिळाला आहे. तसेच इतर सदस्यांनाही याबाबत कळवण्यात येणार आहे.
- भगवान चिले,
सदस्य, दुर्गसंवर्धन समिती