दौंड-कुरकुंभ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

By Admin | Updated: September 12, 2014 03:28 IST2014-09-12T03:28:17+5:302014-09-12T03:28:17+5:30

दमदार पावसाने दौंड-कुरकुंभ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेल्या साइडपट्ट्या, तसेच साचलेले पाणी यामुळे येथून जाताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Durakh-Kurkumbh road potholes | दौंड-कुरकुंभ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

दौंड-कुरकुंभ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

कुरकुंभ : दमदार पावसाने दौंड-कुरकुंभ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेल्या साइडपट्ट्या, तसेच साचलेले पाणी यामुळे येथून जाताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
दौंड-कुरकुंभ हा रस्ता बारामती, नगरला जोडणारा मुख्य राज्यमार्ग आहे. या रस्त्यावरील वाहतूक २४ तास चालू असते. कुरकुंभ औद्योगिक कारखाने व नगर, बारामती येथील औद्योगिक वाहतूक याच प्रमुख्य रस्त्यावरून होत असते. तसेच, औद्योगिक कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मोठी वर्दळ असते. त्यांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. या रस्त्यावरून प्रवास करताना कित्येक दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात झाले आहे. कुरकुंभ परिसर, कुरकुंभ घाट, भागवतवस्ती, गोळीबार मैदान, वनविभागातून जाणारा रस्ता या विविध ठिकाणी रस्ता खराब झाल्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे परिसरातून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.
रात्रीच्या वेळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कामगारांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कुरकुंभ येथे फिरंगाई देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यातून तसेच राज्यातील विविध कानाकोपऱ्यांतून भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच, दौंड येथून भाविक पायी चालत कुरकुंभपर्यंत येत असतात. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने दौंड-कुरकुंभ रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Durakh-Kurkumbh road potholes