हुंडाबळी! सुशिक्षित पुण्यातही
By Admin | Updated: July 7, 2014 05:35 IST2014-07-07T05:35:32+5:302014-07-07T05:35:32+5:30
मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये हुंडयासाठी होणार्या कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे

हुंडाबळी! सुशिक्षित पुण्यातही
लक्ष्मण मोरे■ पुणे,
मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये हुंडयासाठी होणार्या कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. महागडे घर, आलिशान मोटार आणि व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणावेत याकरिता विवाहितांचा छळ होण्याच्या घटना लक्षणीयरीत्या वाढत आहेत. यासोबतच संशयातून तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधांमधूनही अशा घटना वाढल्याचे चित्र आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस विचारांनी प्रगल्भ होतो, पण पैशांपुढे प्रगल्भता छोटी पडते, असेच या कौटुंबिक छळांच्या प्रमाणावरून दिसते. २0१३ २0१४ (मे अखेर) वर्ष तक्रारी१५0५0 शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणार्या विवाहितांचे प्रमाणही मोठे आहे. सुशिक्षित आणि 'वेल सेटल्ड' नागरिकांच्या घरांचे वासे कौटुंबिक हिंसाचाराने पोखरलेले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या समस्यांच्या निवारणासाठी 'महिला साह्य कक्ष' आहे. या कक्षाकडे वर्षाकाठी कौटुंबिक कलहाच्या साधारणपणे एक हजाराच्या आसपास तक्रारी येतात. त्यांचे समुपदेशन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, ज्या प्रकरणांमध्ये समझोता होत नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठवून गुन्हा दाखल केला जातो.
हुंड्यासाठी छळ होत असेल, तर पूर्वी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न होता; परंतु आता शहराच्या प्रत्येक भागामध्ये महिला संस्था, संघटना आणि महिला बचत गट, पोलिसांच्या महिला समित्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्या महिलांची अशा वेळी मदत घेतली जाते.
तसेच, इंटरनेटवरही भारतातील प्रत्येक कायद्याचे आणि कलमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.