डंपर दुचाकीच्या अपघातात महिला ठार
By Admin | Updated: December 26, 2016 03:39 IST2016-12-26T03:39:54+5:302016-12-26T03:39:54+5:30
पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या महिलेचा डंपरने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

डंपर दुचाकीच्या अपघातात महिला ठार
पुणे : पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या महिलेचा डंपरने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास विमाननगर येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूलसमोर घडला. या अपघातात त्यांचे पतीही गंभीर जखमी झाले आहेत.
मंजूश्री चंद्रभान वर्मा (वय ३८, रा. राजीवनगर, विमाननगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती चंद्रभान जियालाल वर्मा (वय ४२) हे गंभीर जखमी झाले आहेत. डंपरचालक प्रवीण उफाडे (वय ३८, रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तोसुद्धा जखमी झाला आहे.
पोलीस हवालदार एस. एस. वायदंडे यांनी फिर्याद दिली आहे. चंद्रभान आणि मंजूश्री एकाच दुचाकीवरून जात असताना भरधाव आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मंजूश्री यांचा जागीच मृत्यू झाला.
(प्रतिनिधी)