मैलाशुद्धीकरण केंद्रातील टाकीत स्फोट
By Admin | Updated: April 5, 2016 00:50 IST2016-04-05T00:50:15+5:302016-04-05T00:50:15+5:30
भाटनगर येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील टाकीत गॅसमुळे स्फोट झाल्याने टाकीचा स्लॅब कोसळला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.

मैलाशुद्धीकरण केंद्रातील टाकीत स्फोट
पिंपरी : भाटनगर येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील टाकीत गॅसमुळे स्फोट झाल्याने टाकीचा स्लॅब कोसळला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली.
दुपारच्या सुमारास अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. कर्मचाऱ्यांचीही धांदल उडाली. काही वेळानंतर हा स्फोट टाकीतील स्फोटामुळे झाल्याचे समोर आले. तसेच छताचा स्लॅब कोसळून टाकी उघडी झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी धाव घेतली.
महापालिकेच्या वतीने भाटनगर येथे उभारण्यात आलेले हे मैलाशुद्धीकरण केंद्र ३ एप्रिल २००१ ला सुरू करण्यात आले. प्रकल्प ३० एमएलडी क्षमतेचा आहे. येथील केंद्रात मैलाशुद्धीकरणाच्या टाक्या असून, त्यामध्ये गॅस तयार होतो. या टाक्यांवर सिमेंटच्या स्लॅबचा छत आहे. यापूर्वी टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होत नव्हता. तसेच स्लॅब काही ठिकाणी लिकेज असल्याने गॅस बाहेर पडत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या टाक्यांमध्ये गॅसनिर्मितीसाठी नवीन मिक्सर बसविण्यात आल्याने सध्या गॅस तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. तयार होणारा गॅस बाहेर सोडण्यासाठी असलेली यंत्रणा कमकुवत असल्याने हा गॅस टाकीतच राहिला. दरम्यान, सोमवारी दुपारी उन्हाचेही प्रमाण अधिक असल्याने टाकीत स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाटनगरसह चिखली व कासारवाडी येथेही अशा प्रकारचे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. या केंद्रातील टाक्यांचेही छत सिमेंटच्या स्लॅबचे असून, हे स्लॅब जीर्ण झाले आहेत. तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या टाक्यांचे छत रबरचे बनविण्यात आले आहे. त्यामुळे गॅसचे प्रमाण कमी-अधिक झाल्यास रबरच्या छताची उंची त्या प्रमाणात कमी-जास्त होत असल्याने ताण येत नाही.(प्रतिनिधी)