कालव्यात मैलापाण्याची डबकी
By Admin | Updated: January 24, 2017 02:27 IST2017-01-24T02:27:59+5:302017-01-24T02:27:59+5:30
मागील महिन्याभरापासून बेबी कालव्यातून पाणी बंद झाले, तर नव्या कालव्यातून गेल्या आठवड्यापासून पाण्याचा विसर्ग बंद

कालव्यात मैलापाण्याची डबकी
हडपसर : मागील महिन्याभरापासून बेबी कालव्यातून पाणी बंद झाले, तर नव्या कालव्यातून गेल्या आठवड्यापासून पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. त्यामुळे कालव्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली असून, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद असल्याने तातडीने पाटबंधारे आणि महापालिकेने कालव्याची स्वच्छता करून औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुणे शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याप्रमाणे मुंढवा येथे जॅकवेल प्रकल्प उभारला आणि गेल्या वर्षभरापासून खुटबावपर्यंत शेतीसाठी पाणी सुरू केले. गेल्या महिन्याभरापासून मुंढवा जॅकवेलमधून बेबी कालव्यात पाणी सोडले नाही. जॅकवेलमधून एका पंपाद्वारे पाणी कालव्यात सोडले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कालव्यात पाणी येत नसल्याचे चित्र दिसत आहे.
कालव्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठल्यामुळे मोकाट कुत्री, जनावरे आणि डुकरांचा वावर वाढला आहे. कालव्यालगतचे नागरिकही कचरा टाकतात. त्यामुळे कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कालव्यालगतच्या महापालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंढवा जॅकवेलमधून पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच पाणी कालव्यात सोडावे, असे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्षात नदीतील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर कायदेशीर कारवाई केली होती. त्याचबरोबर हरित लवादानेही पाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे आक्षेप घेतला होता. त्यानंतर शेवाळवाडी, साडेसतरानळी व कालव्यालगतच्या अनेक ग्रामपंचायतींच्या वतीनेही हरकती नोंदविल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जॅकवेलमधून सोडल्या जाणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याविषयी पालिकेवर याचिका दाखल केली होती. हे प्रकरण सध्या
न्यायप्रविष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)