महापौरांच्या प्रभागातच खोदाई
By Admin | Updated: April 5, 2016 01:00 IST2016-04-05T01:00:04+5:302016-04-05T01:00:04+5:30
रस्ते खोदाई थांबवण्याच्या महापौरांच्या आदेशाला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याच, वर आता थेट त्यांच्याच प्रभागातील नव्या रस्त्याच्या खोदाईला परवानगी देत

महापौरांच्या प्रभागातच खोदाई
पुणे: रस्ते खोदाई थांबवण्याच्या महापौरांच्या आदेशाला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याच, वर आता थेट त्यांच्याच प्रभागातील नव्या रस्त्याच्या खोदाईला परवानगी देत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यामुुळेच महापौरांनी नागरिक तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनीच रस्ते खोदाईचे काम थांबवण्याची चळवळ सुरू करावी, असे जाहीर आवाहन केले.
महापौर प्रशांत जगताप यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला रस्ते खोदाईची सर्व कामे थांबवण्याचे आवाहन केले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने एकाही कंपनीला तसा आदेश दिला नाही. त्यामुळे शहरातील रस्त खोदाई सुरूच राहिली. त्यावर संतापलेल्या महापौरांनी आयुक्त कुणाल कुमार तसेच पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांना धारेवर धरीत ते कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत अशी विचारणा केली होती. तरीही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. आता तर त्यांनी थेट महापौरांच्याच प्रभागातील २९ मार्चला काम पूर्ण झालेले नवे कोरे रस्ते खोदण्याचा आदेश एका कंपनीला दिला आहे. सोमवारी सकाळी प्रभागात फिरताना महापौरांना हे रस्ते खोदलेले आढळले व त्यांच्या संतापाचा पारा चढला.
आयुक्त कुणाल कुमार तसेच पथ विभागाचे राऊत यांच्याकडे त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी खासगी कंपन्यांचा त्यांच्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी देण्यातून २६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचा युक्तिवाद केला. ३० मेपर्यंत रस्ते खोदाईची सर्व कामे संपतील असे आयुक्तांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना महापौरांनी याचा समाचार घेतला. अशी कामे २८ फेब्रुवारीलाच संपणे अपेक्षित आहे. ती ३१ मार्चपर्यंत लांबवण्यात आली. आता पुन्हा ३० मे असे सांगण्यात येत आहे.