शॉर्टसर्किटमुळे साडेचार एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST2021-04-03T04:09:48+5:302021-04-03T04:09:48+5:30
वडगाव काशिंबेग येथील दत्तात्रय भाऊसाहेब निघोट यांच्या गट नंबर ४५२ मधील असलेल्या उसाला सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. निघोट ...

शॉर्टसर्किटमुळे साडेचार एकरातील ऊस जळून खाक
वडगाव काशिंबेग येथील दत्तात्रय भाऊसाहेब निघोट यांच्या गट नंबर ४५२ मधील असलेल्या उसाला सकाळी साडेअकरा वाजता आग लागली. निघोट यांच्या शेतावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. या वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट होऊन उसाने पेट घेतला. बघता बघता आगीने उसाच्या शेताला वेढले. ऊस काढणीस आलेला होता. सकाळी कडक ऊन असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग शेजारील शेतकरी नवनाथ मानकर यांच्या शेतापर्यंत पोहोचली. नवनाथ मानकर यांच्या उसाने पेट घेतला. दत्तात्रेय निघोट यांच्या अडीच एकर क्षेत्रातील तसेच नवनाथ मानकर यांच्या दोन एकर क्षेत्रातील ऊस आगीत जळून गेला आहे. कैलास वाळुंज, ज्ञानेश्वर मानकर, सुनील मानकर, ज्ञानेश्वर वाळुंज, नंदकुमार मानकर, अनिता निघोट, सुनीता निघोट, संजय निघोट, रेशमा दैने यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीत शेतकऱ्याचा साडेचार एकर क्षेत्रातील ऊस जळून गेला आहे. परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नामुळे दोन एकर क्षेत्रातील ऊस वाचला आहे. दरम्यान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आगीच्या घटनेची माहिती देण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी तातडीने एक ऊसतोड टोळी जळालेला ऊस तोडण्यासाठी पाठवली आहे. जळालेला ऊस एका दिवसात तोडून नेणार असल्याची माहिही बेंडे यांनी दिली.
०२मंचर आग
श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील साडेचार एकर क्षेत्रातील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.