वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा फराळ काढणार ‘दिवाळं’
By Admin | Updated: October 25, 2015 03:37 IST2015-10-25T03:37:47+5:302015-10-25T03:37:47+5:30
दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची चाहूल बाजारात जाणवत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा गोडधोड फराळ यंदा सर्वसामान्यांचे दिवाळं काढणारा

वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा फराळ काढणार ‘दिवाळं’
बारामती : दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची चाहूल बाजारात जाणवत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा गोडधोड फराळ यंदा सर्वसामान्यांचे दिवाळं काढणारा ठरणार आहे. फराळाची लज्जत वाढविणारे लाडू यंदा डाळींच्या महागाईने वेढले आहेत. गतवर्षीच्या तुलनेने किराणा मालाचे दर दीडपटीने वाढले आहेत.
फराळाच्या ताटातील लज्जत वाढविणारे बुंदीचे लाडू, बेसन लाडू, शेव, चकली, शेवलाडू आदी पदार्थ हे हरभरा डाळीपासून तयार होणाऱ्या बेसनापासून बनतात.
बारामती शहरातील बाजारपेठेतहरभरा डाळ ७२ ते ७५ रुपये प्रतिकिलो दराने विक्रीला आहे. गतवर्षी हाच दर ४० ते ४२ रुपये प्रतिकिलो होता. दीडपटीहून अधिक हे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे यंदाची लक्षात राहणारी ठरेल तर बेसन पीठ सध्या बाजारात ८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. गतवर्षी हाच दर ४८ ते ५० रुपये प्रतिकिलो होता, असे निमसाखर येथील दुकानदार संतोष दहीदुले यांनी सांगितले.
वाढलेले दर, दुष्काळी परिस्थिती यामुळे ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. गरजेपुरता किराणा माल खरेदी करण्याकडे व्यावसायिकांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
शासनाकडून साठेबाजीवर होणाऱ्या कारवाईचा देखील बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे. किरकोळ दुकानदारांनी ‘थांबा आणि पहा’ असे धोरण स्वीकारले आहे. दरातील चढउतार पाहता किराणा मालाची खरेदी करण्यास काही व्यापारी धजावत नसल्याचे चित्र आहे. तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १५ किलोच्या तेल डब्यामागे एका महिन्यात १०० ते १५० रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे.
शेंगदाणे १०० ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीला आहे. चिवड्याची लज्जत वाढविण्यासाठी शेंगदाणे महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे दिवाळी फराळासाठी आवश्यक असणाऱ्या किराणा मालात चांगलीच वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळाने हैराण झालेल्या सर्वसामान्यांची दिवाळी साजरी करताना चांगलीच दमछाक होणार आहे. (प्रतिनिधी)