पुस्तकखरेदीच्या बंधनामुळे मनस्ताप
By Admin | Updated: June 17, 2015 23:27 IST2015-06-17T23:27:50+5:302015-06-17T23:27:50+5:30
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसूल करून पालकांची लूट केली जाते. त्यात शहरातील काही शाळांनी ठराविक दुकानांमधूनच

पुस्तकखरेदीच्या बंधनामुळे मनस्ताप
पिंपरी : इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसूल करून पालकांची लूट केली जाते. त्यात शहरातील काही शाळांनी ठराविक दुकानांमधूनच विद्यार्थ्यांची पुस्तके खरेदी करावीत, असे बंधन घातले आहे. परंतु, या पुस्तक विक्रीच्या दुकानांमध्ये पुस्तकेच उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत.
पूर्वप्राथमिक शाळांसह शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी सुरू झाल्या असून, सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या माध्यमिक शाळाही काही दिवासांपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांनी ठराविक दुकानांतूनच गणवेश घ्यावा तसेच पुस्तकांची खरेदी करावी, असे बंधन घातले जाते. त्यासाठी पालकांना संबंधित दुकानाचे माहिती पत्र दिले जाते. परिणामी दुकानदाराने सांगितलेल्या किमतीत पालकांना गणवेशाची आणि पुस्तकांची खरेदी करावी लागते. तर, काही शाळा या पालकांना शाळेतूनच पुस्तकांची विक्री करतात. आमच्या शाळेची पुस्तके दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, असे शाळा प्रशासनाकडून पालकांना सांगितले जाते. सीबीएसई व आयसीएसई बोर्डांच्या शाळांची अनेक पुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी या ठराविक विषयांची पुस्तकेच बाजारपेठेत उपलब्ध आहेत. सीबीएसई व आयसीएसई बोर्डांच्या शाळा सुरू होऊन एक महिना होत आला; मात्र अद्याप पालकांना बाजारात पुस्तके मिळत नाहीत. तसेच शाळेकडून ठराविक दुकानांमधून पुस्तकांची खरेदी करण्याचे बंधन घातल्यामुळे संबंधित दुकानात गेल्यास पालकांना पुस्तके मिळत नाहीत. (प्रतिनिधी)
कोणतीही शाळा पालकांवर ठराविक दुकानांमधून पुस्तके अथवा गणवेश खरेदी करण्याचे बंधन घालत असेल, तर पालकांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत तक्रार करावी. त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यामार्फत संबंधित शाळेवर कडक कारवाई केली जाईल.
-रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, पुणे