माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेला पेटविले
By Admin | Updated: January 16, 2015 01:20 IST2015-01-16T01:20:14+5:302015-01-16T01:20:14+5:30
माहेराहून पैसे न आणल्याच्या कारणावरून कांता ऊर्फ सविता तुकाराम मोहोळ या विवाहितेला रॉकेल ओतून पेटविल्याची घटना मावळ तालुक्यातील कडधे येथे घडली

माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेला पेटविले
वडगाव मावळ : माहेराहून पैसे न आणल्याच्या कारणावरून कांता ऊर्फ सविता तुकाराम मोहोळ या विवाहितेला रॉकेल ओतून पेटविल्याची घटना मावळ तालुक्यातील कडधे येथे घडली. ती मृत्यूशी झुंज देत असून आरोपी मात्र मोकाट आहेत. या घटनेत विवाहिता ९५ टक्के भाजली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कांता व तुकाराम यांचा २७ मार्च २००७ रोजी विवाह झाला. विवाहानंतर सात ते आठ महिने संसार सुखात सुरू होता. नवव्या महिन्यापासून आरोपी पती तुकाराम भाऊ मोहोळ (वय ३१), सासरा भाऊ मोहोळ (वय ६५) व सासू द्रुपदाबाई मोहोळ (वय ६०, तिघे रा. कडधे, पवनमावळ, ता. मावळ जि. पुणे) हे कांता यांना माहेराहून पैसे व संसारोपयोगी वस्तू आणण्याची मागणी करू लागले. यावरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. हा छळ थांबविण्यासाठी विवाहितेच्या वडिलांनी अनेकदा पैसे व संसारोपयोगी वस्तूची मागणी पूर्ण केली. दरम्यान, मंगळवारी रात्री तुकाराम याने कांता यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने तुकाराम याने काठी, हाताने मारहाण करीत पैसे घेऊन बाहेर निघून गेला. काही वेळाने दारु पिऊन परतला. घराचा दरवाजा आतून बंद करून कांताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. रॉकेलचा भडका झाल्याने त्याचाही हात भाजला. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. कांता यांच्या आरडाओरड्याने शेजारील रहिवासी धावून आले. आग विझवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे दाखल करून न घेतल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविले. (वार्ताहर)