पालिका निवडणुकीमुळे मजुरांची दिवाळी
By Admin | Updated: February 10, 2017 03:08 IST2017-02-10T03:08:18+5:302017-02-10T03:08:18+5:30
महापालिका निवडणुकीसाठी सर्वत्र प्रचारास सुरुवात झाल्याने भोसरी, दिघी, इंद्रायणी कॉर्नर, लांडेवाडी नाका परिसरातील कामगारांना सध्या

पालिका निवडणुकीमुळे मजुरांची दिवाळी
भोसरी : महापालिका निवडणुकीसाठी सर्वत्र प्रचारास सुरुवात झाल्याने भोसरी, दिघी, इंद्रायणी कॉर्नर, लांडेवाडी नाका परिसरातील कामगारांना सध्या नवा रोजगार मिळाला आहे. मजूर अड्ड्यावर नळ दुरुस्तीची अवजारे, रंगकामाचे ब्रश घेऊन दिवसभर काम मिळण्याची वाट बघण्यापेक्षा अनेक कामगारांनी निवडणूक प्रचाराचे झेंडे हाती घेतले आहेत.
भोसरीतील सर्वच प्रभागांत सध्या घरोघरी फिरत थेट प्रचाराचे तंत्र सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व अपक्षांनी अवलंबिले आहे. चाळी आणि बिल्डिंगमध्येही फिरताना सोबत कार्यर्कत्यांची फौज असेल, तरच उमेदवाराचा प्रभाव पडतो. पण हल्ली कार्यकर्तेही हायटेक झाल्याने खांद्यावर झेंडा घेत दारोदारी फिरण्याची त्यांची तयारी नसते. त्याशिवाय कामावर दांडी मारून प्रचार करण्यातही अनेकांना स्वारस्य नसते. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्ते सोबत घेण्याची वेळ काही उमेदवारांवर आली आहे.
या भाडोत्री कार्यकर्त्यांसाठी आपसूकच मोर्चा वळतो भोसरी परिसरातील मजूर अड्ड्यांकडे. भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, लांडेवाडी छत्रपती शिवाजी चौक, मोशी चौक, चऱ्होली आळंदी फाटा येथील मजूर अड्डे प्रसिद्ध आहेत. प्लंबर, रंगारी, सुतार, हेल्पर, गवंडीकाम करणारे सकाळीच या नाक्यांवर येऊन बसतात.
कामानुसार दिवसभराचा दोनशे, तीनशे ते चारशे रुपयांचा मोबदला त्यांना मिळतो. दररोज काम मिळेलच याची खात्री या कामगारांना नसते. मात्र, निवडणुकांचा हंगाम असल्याने या कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत. काही कामगारांनी गावाकडून नातेवाइकांना बोलवून घेतले आहे. त्यामुळे मजुरांना चांगले दिवस आले आहेत. त्यांना कामाची प्रतीक्षा करावी लागत नाही.(वार्ताहर)