स्पष्ट तरतुदींअभावी ‘जीएसटी’बाबत गोंधळच
By Admin | Updated: July 2, 2017 03:30 IST2017-07-02T03:30:39+5:302017-07-02T03:30:39+5:30
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) या करप्रणालीच्या तरतुदींविषयी अद्याप स्पष्टता आलेली नसल्याने याविषयी अद्याप व्यावसायिकांमध्ये

स्पष्ट तरतुदींअभावी ‘जीएसटी’बाबत गोंधळच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) या करप्रणालीच्या तरतुदींविषयी अद्याप स्पष्टता आलेली नसल्याने याविषयी अद्याप व्यावसायिकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. जीएसटीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागू शकेल, अशी भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली. हॉटेलच्या करात वाढ झाल्याने खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे जाणवत होते. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतीचे बिल सोशल मीडियावरून फिरत होते.
जीएसटी कराची अंमलबजावणी शनिवारी सुरू झाली.
पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ‘‘हॉटेलच्या पदार्थांवर पूर्वी ५ टक्के कर होता तो आता नॉन एसीसाठी १२ टक्के, तर एसीसाठी १८ टक्के झाला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये पूर्वीचे कर लावून मेनूकार्ड बनविण्यात आले होते. मात्र, लगेच मेनूकार्ड बदलणे शक्य नसल्यामुळे काही ठिकाणी ग्राहकांशी वादावादीचे प्रसंग झाले. गोंधळाचे हे वातावरण कमी होण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागतील.’’
इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक प्रकाश खंडेलवाल म्हणाले, ‘‘इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर २८ टक्के जीएसटी असल्यामुळे सुमारे ५ टक्क्यांनी सर्व वस्तू महागणार आहेत. काही वस्तूंवर ६ टक्के असलेला सेवा कर आता २८ टक्के झाला आहे. जीएसटीमुळे वस्तू महाग होणार असल्याने गेल्या आठवडाभरात सर्व वस्तूंची चांगल्या प्रमाणात विक्री झाली. आठवडाभराच्या तुलनेत आज विक्रीचे प्रमाण कमी होते.’’
तांदळाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले, ‘‘तरतुदींबाबत अद्याप संभ्रम असल्याने गुलटेकडी घाऊक बाजारावर त्याचा परिणाम जाणवला. सुट्या धान्यावर जीएसटी नसला, तरी पॅकिं ग धान्यावर पाच टक्के जीएसटी आहे; मात्र ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन, पॅकिंग याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पूर्वी सेवा कर नसलेल्या काही वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला आहे.’’
अजूनही संभ्रमच
ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक म्हणाले, ‘‘करप्रणाली चांगली असली, तरी अद्याप अनेक तरतुदींचा खुलासा झालेला नाही. ट्रेडमार्कची व्याख्या अद्याप स्पष्ट नाही. या तरतुदी स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत जीएसटीबाबत संभ्रम राहील. किरकोळ विक्रेत्यांनी २०० रुपयांपेक्षा जास्त मालाची विक्री केल्यास जीएसटी आकारण्यात येणार आहे.’’