स्तूत दोष असल्याची भीती दाखवून ३५ तोळे सोने पळविले
By Admin | Updated: February 1, 2017 00:13 IST2017-02-01T00:13:08+5:302017-02-01T00:13:08+5:30
वास्तूदोष असल्यामुळे घरात समस्या असल्याची भिती दाखवून एका भोंदूबाबाने एका विधवेकडील ३५ तोळे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

स्तूत दोष असल्याची भीती दाखवून ३५ तोळे सोने पळविले
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.1 - वास्तूदोष असल्यामुळे घरात समस्या असल्याची भिती दाखवून एका भोंदूबाबाने एका विधवेकडील ३५ तोळे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी वानवडी पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे.
हितेंद्र सतीश इंगळे (वय ३२, रा. संजीवनी सोसायटी, सहकारनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेचा सोपानबाग येथे बंगला आहे. महिलेच्या पतीचे २०१३ मध्ये ह्रदयविकाराने निधन झाले. त्यानंतर सासूचे निधन झाले. त्यामुळे महिला एकटीच दु:खात होती. महिलेला एका मैत्रिणीने एका पंडिताची माहिती दिली. तो घरातील दोष दूर करून देईल, असे सांगितले. महिलेने त्या भोंदूबाबाशी संपर्क केला तेव्हा त्याने मदत करण्याचे आश्वासन दिले.
भोंदूबाबा महिलेच्या घरी आला. त्याने तुमच्या वास्तुमध्ये दोष आहे. वास्तूदोष काढण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून पुजेसाठी ११ हजार रुपये घेतले. त्यानंतर तुमच्या सासू, पतीच्या वस्तू व दागिने आहेत. त्यामुळे तुमचे व मुलांचे बरेवाईट होईल, अशी भीती दाखविली. या वस्तू शुद्ध करुन घ्याव्या लागतील, असे सांगितले. महिलेने सोने लॉकरमध्ये असल्याचे सांगितले. लॉकरमधील सोने न पाहता एका पेटीत घालून आण आणि तो कोणालाही सांगू नको, असे सांगितले. पण, महिलेने ते सोने पाहिले. त्यामुळे या सोन्याचा आता काहीच उपयोग नाही. हे सोने नदीत फेकून द्यावे लागेल म्हणत ३५ तोळे सोने घेऊन गेला. पण, त्याचा संपर्क होत नसल्यामुळे महिला घरात रडत बसली होती. त्या महिलेस काही जणांनी पोलिसांना संपर्क करण्यास सांगितला. या महिलेने वानवडी पोलिसांकडे जाऊन वरिष्ठ निरीक्षक सचिन सावंत यांच्याकडे तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांच्या टीमने घरी जाऊन इंगळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून महिलेचे ३५ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.