तीव्र विरोधामुळे सूक्ष्म सर्व्हे थांबवला
By Admin | Updated: November 16, 2016 02:17 IST2016-11-16T02:17:45+5:302016-11-16T02:17:45+5:30
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारपासून कुंभारवळण गावापासून सूक्ष्म सर्व्हेला सुरुवात होणार होती

तीव्र विरोधामुळे सूक्ष्म सर्व्हे थांबवला
खळद : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारपासून कुंभारवळण गावापासून सूक्ष्म सर्व्हेला सुरुवात होणार होती. यासाठी शासनाच्या प्रतिनिधींसमवेत पोलिसांचा मोठा फौजफाटा आला होता. मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पथकाला मोजणी न करताच परतावे लागले.
या वेळी तहसीलदार सचिन गिरी, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, राजेंद्र मोरे, सासवडचे पोलीस निरीक्षक एस. आर. गौड, बाळासाहेब कोंडुभैरी, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, गणेश पिंगुवाले यांसह पोलीस व महिला पोलीस कर्मचारी, पुरंदरमधील महसूल विभागाचे मंडलाधिकारी संजय बडधे, सर्व कर्मचारी उपस्थित होते.
तर पोलिसांचे सहा पिंजरे, सासवड नगरपालिकेची रुग्णवाहिका आणि सासवड व जेजुरी नगरपालिकांची अग्निशामक वाहने आदी फौजफाटा तैनात केला होता. हा केवळ सूक्ष्म सर्व्हे असून, याला शेतकऱ्यांनी विरोध करू नये, असे आवाहन शासनाच्या वतीने पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी सोमवारी बाधित गावांत जाऊन केले होते. त्या वेळी बाधित गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना चर्चेसाठी बोलविण्याची मागणी केली होती.
मंगळवारी सर्व्हेचे पथक पोलीस बंदोबस्तात आले असता, कुंभारवळणसह इतर बाधित गावांतील शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला. जिल्हाधिकारी यांच्यासोबत प्रत्येक बाधित गावांतील सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व इतर दोन प्रमुखांची बैठक घेण्याचे ठरले आहे. तोपर्यंत सर्व्हे होऊद्या, अशी विनंती करण्यात आली. मात्र ग्रामस्थांनीही सदरच्या बैठकीपर्यंत हा सर्व्हे थांबवावा, असे शासनाला आवाहन केले. त्यानुसार मंगळवारचा सर्व्हे थांबविण्यात आला.
या वेळी माजी उपसभापती देविदास कामथे व सरपंच अमोल कामथे यांनी जिल्हाधिकारी यांना बाधितांच्या व्यथा सांगून विमानतळ सूक्ष्म सर्व्हे थांबविण्याची विनंती करणार आहोत. त्यानंतरही त्यांची भूमिका विमानतळाच्या बाजूने राहिली तर आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर)