जलतरण तलावात बुडून विद्यार्थिनीचा मृत्यू
By Admin | Updated: January 13, 2016 03:37 IST2016-01-13T03:37:50+5:302016-01-13T03:37:50+5:30
कोथरूड येथील मिलेनियम स्कूलमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पुणे महापालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षित

जलतरण तलावात बुडून विद्यार्थिनीचा मृत्यू
पुणे : कोथरूड येथील मिलेनियम स्कूलमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पुणे महापालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षित जीवरक्षक नसल्यामुळे या मुलीचा जीव गेला असल्याची माहिती समोर येत आहे.
रिया नितीन कदम या ११ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे यांनी सांगितले, की माझी भाची मिलेनियम स्कूलमध्ये शिक्षण घेते. सायंकाळी घरी परतल्यावर तिने हा प्रसंग सांगितला. त्यावर मी मुलीच्या नातेवाइकांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. मिलेनियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना कर्वेनगर येथील मेंगडे तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मंगळवारी तिसरीच्या विद्यार्थ्यांना तलावावर पोहण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र, या तलावावर एकही प्रशिक्षित जीवरक्षक नव्हता. मुलीची आई व वडील दोघेही इंजिनिअर आहेत. शाळेतील ४० विद्यार्थी पोहण्यासाठी जातात; मात्र पोहायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत जीवरक्षक नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. शाळा प्रशासनाने महापालिकेच्या जलतरण तलावावरील सुविधांची तपासणी न करताच करार करून विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, असा आरोपही शेडगे यांनी केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.