टंचाईतही शहरात पाण्याचा ‘सुकाळ’

By Admin | Updated: September 4, 2015 02:22 IST2015-09-04T02:22:20+5:302015-09-04T02:22:20+5:30

शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही

'Dry season' of water in city due to scarcity | टंचाईतही शहरात पाण्याचा ‘सुकाळ’

टंचाईतही शहरात पाण्याचा ‘सुकाळ’

पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महापालिकेने दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर शहरात पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे असंख्य फोन कॉल्स येत आहेत.
पाण्याचा गैरवापर केल्यास पुणेकरांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा देणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा झाला आहे, या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी वर्षभर वापरण्याचे आव्हान शहरासमोर उभे ठाकले आहे.
पाण्याची आणीबाणी निर्माण झाल्यानंतर झोपेतून जागे झालेले पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता कामाला लागले आहेत. येत्या वर्षभरात मोठ्या पाणीकपातीला शहराला सामोरे जावे लागणार आहे.
आयडियल कॉलनीतील विजया पांडे यांनी बॉम्बे स्टेशनरीजवळ ४ महिन्यांपासून पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे कळविले आहे. कस्तुरबा वसाहतीमध्ये मोटारी बसवून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे नगरसेवक कैलास गायकवाड यांनी फोन करून कळविले आहे. पर्वती दर्शन येथील साईबाबा मंदिराजवळ दिवसरात्र पाणी वाहत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली आहे. दत्तवाडी येथील पाण्याच्या टाकीतून सतत पाणी गळती होत असल्याची तक्रार आली आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन, टाक्या येथून पाणीगळती होत असल्याची माहिती नागरिकांकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिली जाते; मात्र त्याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच नळकनेक्शन तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी करणाऱ्या प्रशासनावर आयुक्त कधी कारवाई करणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

गुरुवारी सकाळी भिडे पुलाजवळ पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाइपलाइन फुटून अनेक तास उलटले तरी पाणीपुरवठा विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी आला नव्हता. शहरामध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण झाली असताना पाणीपुरवठा विभागाकडून होत असलेल्या या निष्काळजीपणाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.

गळती, गैरवापर दिसला तर लगेच फोन करा
शहरामध्ये कुठेही पाण्याचा गैरवापर होत असल्याचे तसेच गळती होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर महापालिकेस माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे.

गणेश खिंड रस्त्यावरील खैरेवाडी येथे मेनलाइनमधून पाणी वाहात असल्याची माहिती बोडके यांनी दिली आहे.

येरवडा येथील राज चौकामध्ये पाणीगळती होत असल्याचे फिरोज शेख यांनी कळविले आहे.

ससून कॉलनीमध्ये पाण्याच्या टाक्यांमधून अनेक वर्षांपासून पाणी गळती होत आहे.

Web Title: 'Dry season' of water in city due to scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.