खोर परिसरातील बंधारे पडले कोरडे ठणठणीत
By Admin | Updated: July 13, 2015 04:12 IST2015-07-13T04:12:52+5:302015-07-13T04:12:52+5:30
खोर (ता. दौंड) परिसरामधील सर्वच ठिकाणचे ओढे, नाले, तलाव हे ऐन पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कोरडे ठाण पडले आहेत

खोर परिसरातील बंधारे पडले कोरडे ठणठणीत
खोर : खोर (ता. दौंड) परिसरामधील सर्वच ठिकाणचे ओढे, नाले, तलाव हे ऐन पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कोरडे ठाण पडले आहेत.खोर परिसराला दुष्काळाच्या कालावधीत वरदान ठरत असलेला डोंबेवाडी पाझर तलावात केवळ एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा उरलेला असून, तोही महिन्याच्या आत पाऊस जर झाला नाही तर तोही कोरडा पडला जाणार असल्याने ऐन पावसाळ्याचा कालावधी असूनदेखील या भागाला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. जून प्रारंभ होताच पावसाने तुरळक हजेरी लावली होती. काही ठिकाणच्या परिसरात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या; मात्र तुरळक पावसाने विहिरींना पाणी आलेच नसल्याने बऱ्याच ठिकाणच्या परिसरामधील विहिरी अजूनही कोरड्याठाक आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप पिकाचा हंगाम वाया जातो की काय, या संभ्रमात शेतकरी वर्ग पडला गेला आहे.
आकाशात जमणारे काळेकुट्ट ढग, उष्णतेमुळे तापमानात झालेली वाढ असे पावसासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती होऊनदेखील पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. आगामी काळतही पावसाची अशीच परिस्थिती राहिली गेली तर खोर परिसराबरोबरच देऊळगावगाडा, माळवाडी, नारायणबेट, पडवी, कुसेगाव या भागांमधील गावांची पाण्याची परिस्थिती भीषण होऊन शेतकरी वर्ग आणखीच अडचणीत सापडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. पाण्याची कमतरता भासू लागल्याने शेतकऱ्यांनी बोअरवेल जमिनीमध्ये घेतले; मात्र पाण्याची पातळीच खालावली गेली असल्याने बोअरवेललादेखील पाणी लागत नसल्याचे या भागामधील एकंदरीत चित्र आहे.
दरवर्षी या कालावधीमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडून विहिरी, तलाव, नाले, गावबंधारे यांना मुबलक पाणीसाठा असतो, मात्र यावर्षी पावसाने चांगलीच पाठ फिरवली असल्याने शेतीच्या पाण्याची समस्या आणखीच बिकट होण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)