‘औषधांची नशा’

By Admin | Updated: October 28, 2015 01:19 IST2015-10-28T01:19:34+5:302015-10-28T01:19:34+5:30

पुणे जिल्ह्यातील तरुणाई सध्या औषधांच्याच नशेला बळी पडत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. राज्यासह ग्रामीण भागातदेखील ही नशा हळूहळू पसरण्यास सुरुवात झाली आहे

'Drug addicts' | ‘औषधांची नशा’

‘औषधांची नशा’

लक्ष्मण शेरकर, ओझर
पुणे जिल्ह्यातील तरुणाई सध्या औषधांच्याच नशेला बळी पडत असल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. राज्यासह ग्रामीण भागातदेखील ही नशा हळूहळू पसरण्यास सुरुवात झाली आहे. चोरट्या मार्गाने बॅन केलेली (बंदी घातलेली) औषधे आणली जात असून, औषध माफिया चौपट किमतीला ती तरुणांना विकत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे.
लोकमत प्रतिनिधीने या प्रकरणाचा शोध घेतला असता, ग्रामीण भागात अनेक तरुण छुपेपणाने हे औषध काळ््याबाजारातून विकत घेत आहेत. केवळ मेडिकलमध्येच नव्हे, तर काळाबाजार करणारे औषध माफिया चौपट किंमत आकारून तरुणांना नव्या व्यसनाच्या आहारी नेत आहेत.
नशा करण्याचे नवनवीन प्रकार नशेबहाद्दर शोधून काढतच असतात. आता खोकल्याचे औषध व झोपेच्या गोळ्या यांचा वापर नशा म्हणून करण्याचे प्रमाण वाढत आहे. औषधांच्या या काळ्याबाजारामुळे औषध माफियांचा धंदा हळूहळू ग्रामीण भागात पाळेमुळे घट्ट रोवू लागला आहे. औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची ‘कोरेक्स किंग’ अशी नवी ओळख ग्रामीण भागात निर्माण होत आहे. शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागातील तरुणही या व्यसनांच्या आहारी जात आहेत.
कोरेक्सच्या ५० मिलि बाटलीची किंमत ५७ रुपये, १०० मिलि बाटलीची किंमत ९० रुपये आहे. तसेच, रेस्टिल या ०.२५ एमजीच्या १५ गोळ्यांच्या पाकिटाची किंमत १५ ते १६ रुपये आहे. हे तिप्पट किमतीला, तर कोरेक्सची बाटली २०० रुपयांपेक्षा अधिक किमतीला विकली जाते.
औषधांची नशा
अत्यंत घातक
या गंभीर समस्येबाबत जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष
डॉ. संजय वेताळ म्हणाले, ‘‘डॉक्टरांच्या चिठीशिवाय ही औषधे दिलीच जाऊ नयेत. इतर कोणत्याही नशेपेक्षा या औषधांची नशा अत्यंत घातक असते. सध्या आॅनलाईन औषधखरेदीमुळे या गोष्टीला पायबंद बसण्याऐवजी अधिक फोफावण्याची भीती आहे. ड्रग अ‍ॅडिक्शन ही समस्या अशा औषधांच्या वापरामुळे शहराकडून खेड्याकडेसुद्धा पसरत चालली आहे.’’
डॉक्टरांचेच प्रिस्क्रीप्शन चोरीला?
जुन्नर, आंबेगाव व खेड केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय चोरडिया म्हणाले, ‘‘जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांतील औषधविक्रेते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे देत नाहीत; परंतु औषधांचा काळाबाजार करणारे व नशेबाज तरुण डॉक्टरांची प्रिस्क्रीप्शनच चोरतात व डॉक्टरांची चिठी, पॅड चोरून त्यावर या औषधांची नावे लिहून डॉक्टरांची खोटी सही करून औषधे खरेदी करण्याचा प्रयत्न करतात.’’
लक्झरी बसमधून येतात औषधे
ही औषधे बाहेरच्या राज्यातून लक्झरी बस, ट्रक याद्वारे रात्री-अपरात्री महाराष्ट्रात येतात. शहरापाठोपाठ ग्रामीण भागात हे लोण पसरत आहे ही खेदाची बाब आहे, अशी माहिती सहायक आयुक्त एन. टी. सुपे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भिवंडी, मुंब्रा, गोवंडी या ठिकाणी यापूर्वी चोरट्या मार्गाने औषधविक्री करणाऱ्या औषधविक्रेत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. ही औषधे शेड्यूल्ड एच १ या प्रकारात येत असून, डॉक्टरांच्या चिठीशिवाय त्यांची विक्री करायची नाही, असा कायदा आहे. परंतु, ड्रग इन्स्पेक्टरला या चोरट्या मार्गाने येणाऱ्या औषधांबाबत माहिती मिळत नाही, तसेच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी या गोष्टींचा छडा लावणे अवघड जाते.’’

Web Title: 'Drug addicts'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.