दुष्काळातही शेततळी वरदान
By Admin | Updated: August 6, 2015 03:38 IST2015-08-06T03:38:51+5:302015-08-06T03:38:51+5:30
सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे

दुष्काळातही शेततळी वरदान
शैलेश काटे, इंदापूर
सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे शेतकऱ्यांच्या भरवशाच्या पाण्याच्या बँका ठरलेल्या आहेत. त्यामुळे दुष्काळात शेततळी वरदानच ठरली आहेत.
सन २००३-०४ च्या सुमारास ही शेततळ्यांची योजना सुरू झाली. पुढच्या दोन-तीन वर्षांत तिने गती घेतली. प्रथमत: पुरेशा गांभीर्याने न घेतलेल्या या योजनेचे महत्त्व त्या दशकात सतत दुष्काळ अनुभवणाऱ्या इंदापूरकरांना चांगलेच पटले. आजघडीला सन २०१२-१३, सन २०१३-१४ या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून १९४ सामुदायिक शेततळी झाली आहेत. ४ कोटी ९० लाख १ हजार ७४ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ८ लाख ३१ हजार ५०० घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन २०१३-१४ या वर्षात १३६ लाभार्थ्यांना २ कोटी ६९ लाख ७७ हजार ७७४ रुपये अनुदान मिळाले. निर्माण झालेल्या शेततळ्यांमध्ये ४ लाख ५५ हजार घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
पावसाचा लहरीपणा, भूगर्भातील पाणीपातळीत होणारी घट, वातावरणातील बदलांमुळे तापमानात होणारी वाढ, वीज भारनियमनाचे संकट यातून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्च ते जूनदरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असे. भीमा, नीरा नद्यांच्या किनारी शेतकऱ्यांनी उचलपाणी परवानगी घेऊन अथवा विनापरवाना उपसा सिंचन योजना राबवल्या. त्यामुळे त्यांना उन्हाळा तितकासा जाचत नसे.
नीरा कालव्यावरील बारमाही पाणी परवानाधारकांनाही उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नसे. मात्र, तालुक्यातील निमगाव केतकी पट्टयातील २२ गावे, खडकवासला कालव्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत असे.
आठमाही पाणी परवानाधारकांना मार्च ते जून या कालावधीत शेतीला शाश्वत पाण्याची सोय करण्यासाठी शेततळ्याच्या योजनेचा पर्याय पुढे आला. दुष्काळात त्याची उपयुक्तता जाणवली. शेततळ्याची सुरुवात तालुक्यातील बोरी गावापासून झाली. तेथील द्राक्ष व डाळिंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डाळिंब व द्राक्षासारख्या पिकांना गरजेप्रमाणे पाणी व्यवस्थापन करणे शेततळ्यांमुळे सोयीस्कर होऊ लागले. बघता बघता शेततळे घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली.
चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे जून महिन्यामध्ये फळझाडांची पाण्याची गरज शेततळ्यांनीच भागवली आहे. इंदापूर तालुक्यातील फळबागा मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीवर बहरलेल्या आहेत. ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी फळबागांचे व्यवस्थापन करीत आहेत. शेततळ्यातील पाण्याचा गरजेएवढाच वापर करण्यात येत असल्याने द्राक्ष व डाळिंब बागा योग्य प्रकारे जोपासल्या गेल्या आहेत. काळ्या रंगाच्या द्राक्षाच्या निर्यातीमध्ये इंदापूर तालुका अग्रेसर राहील. त्यामध्ये शेततळ्याचे मोठे योगदान आहे.