केळद खिंडीत दरड कोसळली
By Admin | Updated: June 21, 2015 00:05 IST2015-06-21T00:05:04+5:302015-06-21T00:05:04+5:30
वेल्हा तालुक्यातील पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्यावरील केळद खिंडीजवळ शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास प्रचंड मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली.

केळद खिंडीत दरड कोसळली
कापूरहोळ : वेल्हा तालुक्यातील पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्यावरील केळद खिंडीजवळ शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास प्रचंड मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. या कोसळलेल्या दरडीमुळे पासली परिसर व केळद पंचक्रोशी परिसरातील असणाऱ्या १६ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे़ आज सकाळच्या शाळा असल्याने सुदैवाने विद्यार्थी तसेच पालक बचावले. आज दुपारी वेल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या मढीघाटात निघालेले प्रवासी यातून सुदैवाने बचावले.
वेल्ह्यातून बाजार व साहित्य घेऊन केळद व त्याहून पुढे असणाऱ्या गावातील लोक आज सायंकाळी ६.०० वाजता वेल्ह्यातून घरी परत असताना पूर्णत: या दरडीमुळे त्यांना घरी जाता आले नाही.
केळद खिंडीच्या वरच्या बाजूला डोंगरातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंगापूरला जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केलेला असून या रस्त्याचे मोठमोठे दगड, माती, मुरूम हे या खिंडीच्या रस्त्याच्या लगत बेजबाबदारपणे टाकून पावसाळ्यात काय होईल, याचा विचार केला नाही. वेल्ह्यात आज दिवसभर प्रचंड मुसळधार पावसामुळे या खिंडीच्या लगतचे दगड, माती, मुरूम तसेच न उकरलेले दगड रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली.
याबाबत वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, की या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवले आहे़ २ जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेली माती, दगड काढण्याचे काम सुरु आहे़ उद्या सकाळपर्यंत रस्ता पूर्ववत सुरु होईल़ सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन रस्ता करताना डोंगर खोदाई तिरकी न करता सरळ केल्याने पावसामुळे मोकळे झालेले दगड, माती रस्त्यावर आली़ सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे.
माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या पूर्वी सर्व्हे केला आहे़ करणवडी येथील धोकादायक भाग काढून टाकला आहे़ आता पाऊस सुरु झाल्याने पुन्हा एकदा सर्व्हे करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़