दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: September 19, 2015 04:42 IST2015-09-19T04:42:33+5:302015-09-19T04:42:33+5:30
मांजरी, आव्हाळवाडी, वाघोलीतील चोखी ढाणी परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बछड्यांसह वावर असणारा बिबट्या वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात

दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद
वाघोली / मांजरी : मांजरी, आव्हाळवाडी, वाघोलीतील चोखी ढाणी परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बछड्यांसह वावर असणारा बिबट्या वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
शुक्रवारी सकाळी ७च्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन बछडे अद्यापही सापडले नसून जेरबंद बिबट्या जुन्नर-माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये हलविण्यात आला आहे. वाहनांना आडवे जाणे, कुत्र्यांची शिकार करणे, पाळीव जनावरांच्या वासरांना लक्ष्य करण्याचे प्रकार बिबट्याकडून केले जात होते. शनिवारी (दि. १२) जयप्रकाश द्विवेदी या कामगारावरला रात्रीच्या वेळी बिबट्याच्या बछड्यांनी हल्ला करून जखमी केले होते.
या प्रकारानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी काठ्या, हत्यारे जवळ बाळगूनच बाहेर पडावे लागत होते. नागरिकांच्या तक्रारीवरून बाएफ कंपनीजवळ झुडपामध्ये एक पिंजरा आठ दिवसांपूर्वी बसविण्यात आला होता; मात्र सावज नसल्यामुळे बिबट्या काही त्यामध्ये जेरंबद होत नव्हता. वन विभागाकडे पिंजऱ्यात सावज ठेवण्याची विनंतीदेखील केली होती; परंतु वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत सावज ठेवता येत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जात होती. तोपर्यंत नवनाथ आव्हाळे यांच्या गोठ्यातील ५ जनावरांचा फडशा बिबट्याकडून पाडला गेला होता. अखेर गुरुवारी वन विभागाच्या कार्यवाहीतील दिरंगाई पाहून माजी सरपंच नारायण आव्हाळे यांनी गावातील तरुणांच्या मदतीने नवनाथ आव्हाळे यांच्या घराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतीच्या जवळ पिंजरा हलविला. तोपर्यंत वन विभागाच्या वतीने सावज ठेवण्याची परवानगी आली असल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी बकरीचे सावज पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकून उस्मान सय्यद आणि अन्वर खान या ठिकाणी आले आणि बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे दिसले. दोघांनी तत्काळ आव्हाळवाडीतील नागरिकांना कळविले. तरुणांनी पिंजऱ्याला लगेच कुलूप लावून पिंजऱ्याजवळ ठाण मांडले. वन विभागालाही कळविल्यानंतर वनाधिकारी संतोष ताकवले, आर. टी. मगर, व्ही. व्ही. निकम या ठिकाणी दाखल झाले. स्थानिक तरुण आणि वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास जुन्नर-माणिकडोह
बिबट्या निवारण केंद्रामध्ये हलविण्यात आले़
पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या ८ वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये बिबट्याची सर्व तपासणी करण्यात येत असून, पूर्णपणे सदृढ आढळल्यास वनक्षेत्रामध्ये सोडून देण्यात येईल. त्या परिसरामध्ये काही संशयित आढळल्यास पुन्हा पिंजरा लावण्यात येईल.
- सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक पुणे