गूढ आवाजाने दिघीत नागरिक भयभीत
By Admin | Updated: January 6, 2015 00:29 IST2015-01-06T00:29:39+5:302015-01-06T00:29:39+5:30
अचानक बसणाऱ्या हादऱ्यामुळे थरथरणाऱ्या भिंती, मांडणीवरून पडलेली भांडी, जणू घरच हलत आहे की काय, असा होणारा भास नव्हे तर ही वास्तव परिस्थिती आहे

गूढ आवाजाने दिघीत नागरिक भयभीत
दिघी : अचानक बसणाऱ्या हादऱ्यामुळे थरथरणाऱ्या भिंती, मांडणीवरून पडलेली भांडी, जणू घरच हलत आहे की काय,
असा होणारा भास नव्हे तर ही वास्तव परिस्थिती आहे. दिघी, चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी या परिसरात दिवसा व रात्री अचानक हादरे जाणवत आहेत. या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची घबराट निर्माण झाली आहे.
दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी व चोविसावाडी ही गावे १७ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाली. त्यानंतर या भागाचे विस्तारीकरण झपाट्याने होत गेले. आजही या भागात मोठमोठ्या इमारती उभारण्याचे काम सुरूच आहे. झपाट्याने वाढणाऱ्या विस्तारीकरणाबरोबरच या भागातील लोकसंख्याही झपाट्याने वाढतच आहे. हा भाग म्हणजे महानगरपालिकेचे अगदी शेवटचे टोक. पुणे-आळंदी रोडवर असलेला हा परिसर, याला लागूनच (दिघी मॅग्झिन) आर्मीची हद्द लागते. आर्मी हद्दीतही नेहमी होणाऱ्या दारुगोळ्यांच्या चाचण्या याही नागरिकांसाठी डोकेदुखीचा भाग बनला आहे. या हद्दीलगतही मोठमोठ्या इमारती आहेत. या इमारतीमध्ये दिवसा व रात्री अचानक भिंती थरथरत असल्याचा भास होतो. अनेक वेळा घरातील मांडणीवरील भांडी पडल्याचे या परिसरातील नागरिक सांगतात.
आर्मी हद्दीत नेहमीच दारुगोळ्याच्या चाचण्या घेतल्या जातात. याचा मोठमोठा आवाज कानावर येतो. शिवाय इमारतींनाही जोराचे हादरे बसतात. काही महिन्यांपूर्वी दिघी परिसरात भूकंप होऊन घरातील भांडी खाली
पडली होती. मात्र तो भूकंप होता की, आर्मीच्या चाचणीमुळे घडले याबाबत नागरिक अनभिज्ञ
आहेत. या भागातील नागरिक सांगतात की, दारुगोळ्याच्या चाचण्यांमुळे इमारती हलतात, घरातील भांडी पडतात. त्यामुळे घर पडते की काय अशी भीती वाटते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तर कमालीची भीती जाणवते. याबाबत अनेक वेळा अधिकाऱ्यांना कळविले असता फक्त पाहणी केली जाते. अलीकडे अशाच प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्याने असे जर काही प्रकार असतील व एखादी गंभीर दुर्घटना घडलीच तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आर्मी हद्दीमध्ये अनेकदा कचरा, भंगार गोळा करणाऱ्या महिला, पुरुष या भागात फिरतात. अनेकदा मुलेही क्रीडांगण म्हणून हद्दीत खेळण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी अचानक होणाऱ्या भीतिदायक चाचण्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.(वार्ताहर)
आठ-नऊ महिन्यांपूर्वी या परिसरात दोन-तीन वेळा भूकंपासारखे धक्के जाणवत होते. याबाबत हवामान खात्याकडे चौकशी केली असता पुण्यासह दिघी परिसरात कोठेच भूकंप झाला नसल्याचे सांगण्यात आले होते. आर्मीकडेही याबाबत माहिती घेतली असता त्यांनीही आमच्या कोणत्याच चाचण्या सध्या घेत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या परिसरात नक्की कशामुळे धक्के जाणवत होते हे गुलदस्तातच राहिले.- चंद्रकांत वाळके, नगरसेवक
आर्मी हद्दीत होणाऱ्या दारुगोळ्याच्या चाचण्यांमुळे या भागात सतत होणारा मोठा आवाज व त्यामुळे हादरणारी घरे ही परिस्थितीच भयानक वाटते. आर्मीने आपल्या या चाचण्या नागरी वस्त्यांजवळ करण्यापेक्षा चाकणच्या घाटात घेतल्यास नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य राहील.- सुनील तापकीर, दिघी
चऱ्होली परिसरातही अचानक हादऱ्याचा त्रास जाणवतो. मोठा आवाज आल्यासारखा वाटतो. हा प्रकार नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भीतिदायक आहे. लहान-मोठ्या घरांसह मोठ्या व उंच इमारतींनाही याचा निश्चितच धोका जाणवतो.
- राहुल तापकीर, चऱ्होली