दौंडला मिळाले पाणी

By Admin | Updated: May 6, 2016 05:45 IST2016-05-06T05:45:01+5:302016-05-06T05:45:01+5:30

खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दौंड तालुक्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली

Drand gets water | दौंडला मिळाले पाणी

दौंडला मिळाले पाणी

यवत : खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दौंड तालुक्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली. गुरुवार (दि. ५) दुपारच्या सुमारास तालुक्यात पाणी पोहोचले. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने दौंड शहर व तालुक्यातील गावठाणांतील नागरिक कालव्यातील पाण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
पुण्यातील राजकीय विरोधानंतर हे पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले आहे. परंतु, पाणी कधी येणार, याची ग्रामस्थ वाट पाहत होते. राजकीय गदारोळ आणि विरोधानंतरदेखील पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड व इंदापूर या तालुक्यांसाठी १ टीएमसी पाणी कालव्याद्वारे देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. दौंड तालुक्याला पिण्यासाठी पाणी दिले जावे, अशी आग्रही मागणी करणारे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचे आभार मानले आहेत.
गुरुवारी दुपारी कालव्यातील पाणी दौड तालुक्यात पोहोचले. मात्र, या पाण्यासमवेत पुणे शहरात कालव्यात टाकण्यात आलेला कचरादेखील प्रवाहाबरोबर वाहत येताना दिसत होता. यामुळे टंचाईच्या काळात मिळालेले पाणीदेखील दूषित आणि कचरायुक्त असल्याचे दिसून येत होते. दौड तालुक्यात धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी धरणग्रस्तांना देऊन त्याग केला आहे. तर, धरणात जमिनी गेलेले शेतकरीदेखील आता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना, दौंडच्या हक्काचे पाणी पुण्यातील जनतेला पिण्यासाठी दिले जात आहे. आता शेतीसाठी नाही तर निदान पिण्यासाठी तरी पाणी मिळावे, याकरिता दोन्ही तालुक्यांतील नागरिक मागणी करीत आहेत.
एकीकडे मिरजमधील पाणी दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने दिले जाताना मिरजेच्या जनतेने सहकार्य केले, तर दुसरीकडे दौंड तालुक्यातील जनता तिचे हक्काचे पाणी
शेतीसाठी न मागता निदान पिण्यासाठी मिळावे, यासाठी मागणी करीत असताना पुण्यातील सुजाण
व सुज्ञ नागरिक त्याला विरोध
करतात, ही शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया दौड तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

१३ मेपर्यंत आवर्तन
दि. १३ मेपर्यंत कालव्यातून दौंड व इंदापूर तालुक्यांसाठी पिण्याकरिता सोडण्यात आलेले आवर्तन सुरू ठेवण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तालुक्यातील दौंड शहर व गावोगावचे पिण्यासाठी असलेले तलाव व विहिरी या पाण्याने भरण्यात येणार असल्याने काहीसा दिलासा येथील ग्रामस्थांना मिळाला आहे.

पाण्यासोबत कचरा
कालव्याची सफाई न झाल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात कचरा आला. यामुळे टंचाईच्या काळात मिळालेले पाणीदेखील दूषित आणि कचरायुक्त असल्याचे दिसून येत होते.

Web Title: Drand gets water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.