डॉ. दीपक टिळक यांचा जपान सरकारकडून गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:16 IST2021-02-17T04:16:06+5:302021-02-17T04:16:06+5:30
पुणे : भारतामध्ये जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ...

डॉ. दीपक टिळक यांचा जपान सरकारकडून गौरव
पुणे : भारतामध्ये जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांना गौरवण्यात आले. जपान सरकारतर्फे भारतातील वाणिज्य दूत मिचीओ हरादा यांच्या हस्ते मंगळवारी टिमवित डॉ. टिळक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जपानी भाषेच्या अध्यापनाचे कार्य करणाऱ्या जगातील २८ विद्यापीठांपैकी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला हा पुरस्कार प्राप्त झाला. जपान सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मोटेगी तोशिमित्सु यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि भेटवस्तू यावेळी डॉ. टिळक यांना दिली. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विद्यापीठाच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणीती टिळक आणि सांस्कृतिक व माहिती विभागाचे उपवाणिज्य दूत ताउची नोरितका उपस्थित होते.
डॉ. टिळक म्हणाले, विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी वर्षामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून मागील २४ वर्षांपासून जपानी भाषा आणि संस्कृतीचा प्रचार व प्रसार सुरू आहे. जपानी भाषेच्या अभ्यासक्रमाची सुरूवात करणारे स्व. विनय साठे यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. जपान फाउंडेशनने अभ्यासक्रमासह जपानी भाषा कशा प्रकारे शिकवावी, याचे तंत्रदेखील शिकवले. त्यामुळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी जगात उत्तम कार्य करत आहेत. त्यांपैकी अनेकांनी शिष्यवृत्तीदेखील प्राप्त केली आहे,
संभाषण, परदेशातील नोकरी, औद्योगिक बाजारपेठ आणि विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा याकरीता जपानी भाषेचा ‘व्यवसाय संज्ञापन’ हा एक वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्यासाठी जपान फाउंडेशनकडे आपण शिफारस केल्यास मदत होईल. पुढील वर्षापासून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास त्याची मदत होईल, असे आवाहन डॉ. दीपक टिळक यांनी हरादा यांना केले. डॉ. टिळक यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, जपान भाषेच्या प्रसारासाठी विद्यापीठाच्या या उपक्रमास शक्य तितकी मदत करण्याचे आणि जपानी फाउंडेशनसोबत चर्चा करण्याचे आश्वासन हरादा यांनी दिले.