डाॅ. आशिष भारती यांना अटकपूर्व जामीन; पुणे महापालिकेतील अँटीजेन घोटाळा प्रकरण

By नम्रता फडणीस | Published: February 16, 2024 05:48 PM2024-02-16T17:48:26+5:302024-02-16T17:48:48+5:30

खासगी रोगनिदान केंद्र चालकांना वैद्यकीय साहित्याची परस्पर विक्री करुन ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला हाेता

Dr. Ashish Bharti granted anticipatory bail; Antigen scam case in Pune Municipal Corporation | डाॅ. आशिष भारती यांना अटकपूर्व जामीन; पुणे महापालिकेतील अँटीजेन घोटाळा प्रकरण

डाॅ. आशिष भारती यांना अटकपूर्व जामीन; पुणे महापालिकेतील अँटीजेन घोटाळा प्रकरण

पुणे : कोरोना काळात महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयातील काेरोना चाचणी (अँटिजेन), अन्य वैद्यकीय साहित्याची खासगी रोगनिदान केंद्र चालकांना परस्पर विक्री करुन ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला हाेता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात तत्कालीन आरोग्य अधिकारी डाॅ. आशिष भारती यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश बाबूराव कोळुसरे यांनी फिर्याद दिली हाेती. त्यानुसार तपास करून डॉ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला हाेता. हा प्रकार २०२१ मध्ये कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे येथे घडला हाेता.

डॉ. आशिष भरती यांच्या तर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. गुन्हा दाखल करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७ नुसार सरकारची परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु या गुन्ह्यात सरकारची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तसेच या प्रश्नाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार व इतर अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून कोरोना काळात जे किट वाटले होते. त्यात केवळ अनियमितता आढळली. त्यात कोणताही आर्थिक घोटाळा झाला नाही, असा निष्कर्ष नोंदविला होता, असे सांगून ॲड. ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.

तक्रारदार सतीश कोळसुरे यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करत असताना डॉ. आशिष भारती यांनी कोणतीही मदत न केल्याने व त्यांच्या विषयी सहानुभूती दाखविली नसल्यामुळे त्यांनी डॉ. आशिष भारती यांचे विरुद्ध खोटी तक्रार केली आहे, असेही ॲड. ठोंबरे म्हणाले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर डॉ. आशिष भारती यांना अटी शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Dr. Ashish Bharti granted anticipatory bail; Antigen scam case in Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.