पुण्याला दुहेरी मुकुट
By Admin | Updated: March 12, 2015 23:54 IST2015-03-12T21:54:58+5:302015-03-12T23:54:02+5:30
राज्यस्तरीय कबड्डी : महिलांचे सलग चौथे तर पुरुषांचे पहिले विजेतेपद

पुण्याला दुहेरी मुकुट
पुरळ : पुण्याने १७ व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटात विजय संपादन करून दुहेरी मुकुट मिळविला. पुण्याच्या महिलांचे हे सलग चौथे जेतेपद तर पुरुषांना प्रथमच यश लाभले. महिलांच्या सामन्यात मुंबई उपनगरची कोमल देवकर तर पुरुषांच्या सामन्यात रत्नागिरीचा कुलभूषण कुळकर्णी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्यांना ठाण्याचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी जाहीर केलेले रोख ५ हजार रुपये प्रत्येकी देऊन गौरविण्यात आले.जामसंडे-देवगड येथील विद्याविकास शाळेच्या पटांगणावर बुधवारी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा २६-९ असा पराभव करीत रोख रुपये १ लाख २५ हजार व छत्रपती शिवाजी चषक पटकावला. उपविजेत्या उपनगरला चषक व ७५ हजार रुपयांवर समाधान मानावे लागले.
सामन्यात पहिला गुण घेत मुंबई उपनगरने सुरुवात झोकात केली. पण, पुण्याने खचून न जाता मध्यंतराला ९-४ अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर तिसऱ्या मिनिटाला लोन देत पुण्याने १६-७ अशी आघाडी घेतली. उपनगर संघाला पूर्णवेळेत आघाडीवर येता आले नाही.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याने रत्नागिरीचे आव्हान १७-७ असे संपुष्टात आणत रोख रुपये १ लाख २५ हजार व चषक पटकावला. रत्नागिरीला रोख रुपये ७५ हजार व चषकावर समाधान मानावे लागले. दुसऱ्या मिनिटाला गुण घेत पुण्याने गुणांचे खोलले. मध्यंतराला ४-१ अशी पुण्याकडे आघाडी होती. नंतर मात्र भक्कम पकडी व चढाईच्या जोरावर ८ गुणांनी विजय साकारला. रत्नागिरीच्या सतीश खांबेने एकाच चढाईत तीन गडी टिपत सामन्यात सनसनाटी निर्माण केली. परंतु दोन वेळा त्याची पकड झाल्यामुळे सामना त्यांच्या हातून निसटला. रत्नागिरीकडून कुलभूषण कुळकर्णी, सतीश खांबे यांनी कडवी लढत दिली. (वार्ताहर)