येरवडा कारागृहात दुप्पट आरोपी
By Admin | Updated: July 4, 2015 00:28 IST2015-07-04T00:28:35+5:302015-07-04T00:28:35+5:30
वकिलांच्या संपामुळे जामीनपात्र गुन्ह्यातही आरोपींना जामीन मिळेनासा झाला आहे. वकिलांच्या संपाचा फटका कैद्यांना बसत असून, त्यांची जामिनाअभावी थेट येरवडा

येरवडा कारागृहात दुप्पट आरोपी
पुणे : वकिलांच्या संपामुळे जामीनपात्र गुन्ह्यातही आरोपींना जामीन मिळेनासा झाला आहे. वकिलांच्या संपाचा फटका कैद्यांना बसत असून, त्यांची जामिनाअभावी थेट येरवडा कारागृहात रवानगी होत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त कैदी कारागृहात झाले आहेत. सध्या कारागृहात कैद्यांची क्षमतेपेक्षा दुप्पट संख्या झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात वकिलांचा दोन आठवड्यांपासून संप सुरू आहे. वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवले आहे. त्यामुळे आरोपींचे वकीलपत्र घेण्यास वकीलच उपलब्ध नाहीत. अटकेनंतर पोलीस कोठडीच्या पूर्ततेनंतर आरोपींना जामीन मिळतो तर काही गुन्ह्यांमध्ये जामीनपात्र कलमे असल्याने अटकेनंतर जामीन मिळतो.
जामिनाच्या कायदेशीर पूर्ततेसाठी पक्षकार वकिलांवर अवलंबून असतात. मात्र, अगदी किरकोळ गुन्ह्यातही जामीनाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वकीलच उपलब्ध नसल्याने परिणामी न्यायाधीश आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावून, येरवडा कारागृहात रवानगी करीत आहेत. मात्र, याचा बोजा येरवडा कारागृहावर पडत आहे. येरवडा कारागृहावर अशी नामुष्की पहिल्यांदाच ओढवली आहे.
अडीच हजार कैद्यांना जामिनाची प्रतीक्षा
सध्याच्या कैद्यांच्या बराकींमध्ये दुपटीपेक्षा जास्त संख्या झाली आहे. सध्या तेथे १७००-१८०० कैद्यांना ठेवता येऊ शकते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ हजारांहून अधिक कैदी कारागृहात आहेत. पुणे जिल्हा न्यायालयाच्या नोंदीनुसार, प्रत्येक दिवसाला पोलीस कोठडीच्या रिमांडच्या सुनावणीसाठी जवळपास ५० पोलिस खटले न्यायालयात दाखल होतात. त्यातील काही खटल्यांमध्ये पोलीस कोठडी मिळते, तर काहींची किरकोळ गुन्हे असल्याने थेट येरवडा कारागृहात रवानगी केली जाते. मागील दोन आठवड्यांत सुमारे अडीच हजार कैद्यांना जामीन न मिळाल्याने तर काहींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने कारागृहात जावे लागले आहे. तसेच कारागृहातील काही आरोपींवर आरोपपत्रही दाखल झाले आहेत. मात्र, वकील मिळत नसल्याने त्यांना कारागृहातच राहावे लागत आहे.