डाएट नक्की कुणाच्या अखत्यारीत?
By Admin | Updated: September 12, 2015 04:10 IST2015-09-12T04:10:57+5:302015-09-12T04:10:57+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून हक्काच्या फेलोशिपपासून वंचित राहिलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीमधील ( डाएट) पीएचडी रिसर्च स्कॉलर

डाएट नक्की कुणाच्या अखत्यारीत?
पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून हक्काच्या फेलोशिपपासून वंचित राहिलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीमधील ( डाएट) पीएचडी रिसर्च स्कॉलर विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये डीआरडीच्या जुन्या नियमानुसार शुक्रवारी फेलोशिप जमा करण्यात आली. मात्र ही फेलोशिप यूजीसी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (एमएचआरडी) नियमाप्रमाणे वाढविण्यात आलेल्या रकमेनुसार नसल्याने त्याबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, त्यांनी शुक्रवारपासून लॅबला टाळे ठोकून आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान, इन्स्टिट्यूटचे कुलसचिव विवेक बत्रा यांनी ‘डाएट’ ही एमएचआरडीच्या अंतर्गत येणाऱ्या इतर युनिव्हर्सिटीमध्ये किंवा यूजीसीच्या एआयसीटीच्या अनुदानित शासकीय युनिव्हर्सिटीच्या कक्षेत मोडते, असे विधान करून विद्यार्थ्यांची झोपच उडवली आहे.
‘डाएटमधील पीचडी रिसर्च फेलोशिप स्कॉलर विद्यार्थ्यांची फेलोशिप दोन महिन्यांपासून रोखली’, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी दिले होते, त्याची दखल घेत प्रशासनाची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना डीआरडीओच्या जुन्या नियमानुसार जेआरएफच्या विद्यार्थ्यांना १८००० रुपये आणि एसआरएफ विद्यार्थ्यांना २०००० रुपयांची फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. त्यानुसार ही फेलोशिप तुम्हाला
दिली जाईल, मात्र डीआरडीओने फेलोशिपच्या वाढीव रकमेबद्दल एमएचआरडीला स्पष्टीकरण मागितले आहे, त्यामध्ये डीआरडीकडून
सूचना मिळाल्या तरच वाढीव रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाईल, असा पुनरुच्चार कुलसचिवांनी केला आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची निदर्शने
विद्यार्थ्यांनी संस्थेच्या आवारात शुक्रवारी निदर्शने केली. मात्र कुलसचिवांनी अंतर्गत सुरक्षारक्षकाला सांगून त्यांना आंदोलनास मज्जाव केला. यासंदर्भात प्रशासनाला मेल पाठविल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरूच ठेवल्याचे पीएचडी रिसर्च स्कॉलर विद्यार्थ्यांनी सांगितले.
कुलसचिवांकडून फेलोशिप देण्याची जी घोषणा झाली, त्याबाबत आम्ही समाधानी नाही. आम्हाला आॅक्टोबर २०१४ नंतरची वाढीव फेलोशिप मिळालीच पाहिजे. तसे न झाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने जाण्याचा विचार करू.
- पीएचडी रिसर्च स्कॉलर विद्यार्थी