कंपनीत कामाला जाऊ नये, म्हणून तरुणाच्या गळ्यावर वार करुन खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST2021-01-13T04:24:58+5:302021-01-13T04:24:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत कामाला जाऊ नये या कारणावरुन झालेल्या वादात एकाने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर, बेंबीजवळ चाकूने ...

कंपनीत कामाला जाऊ नये, म्हणून तरुणाच्या गळ्यावर वार करुन खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीत कामाला जाऊ नये या कारणावरुन झालेल्या वादात एकाने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर, बेंबीजवळ चाकूने वार करुन जबर जखमी केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक काळुराम ताठे (वय ५०, रा. खांदवेनगर, लोहगांव) याला अटक केली आहे.
याबाबत गणेश चौधरी (वय ३२, रा. खांदवेनगर, लोहगांव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चौधरी आणि ताठे हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. अशोक ताठे एका कंपनीत कामाला आहे. चौधरी हा कागदी पुठ्ठे गोळा करुन त्या कंपनीत जमा करण्याचे काम करतात. शनिवारी सायंकाळी खांदवेनगर येथील मिलटरी टॉवरजवळ चौधरी उभे असताना ताठे दारु पिऊन तेथे आला. मी जेथे काम करतो, त्या कंपनीमध्ये असलेले पुठ्ठे गोळा करण्यास जाऊ नको, असे ताठे चौधरीला म्हणाला. त्यावर चौधरी याने कंपनी काय तुझ्या बापाची आहे का असे म्हटले. त्यावर चिडून ताठे याने खिशातून बटन चाकू काढून चौधरी याच्या गळ्यावर, पोटावर, बेंबीजवळ, उजव्या हाताच्या बोटावर वार करुन जबर जखमी केले. विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने अधिक तपास करीत आहेत.