कंत्राटांसाठी जम्बोची यंत्रणा वेठीस धरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:41+5:302021-04-25T04:10:41+5:30

पुणे : पालिकेतील विरोधी पक्षांच्या काही गटनेत्यांनी जम्बो कोविड रुग्णालयात जाऊन डॉक्टर, कर्मचारी आणि व्यवस्थापनाला हिशेब मागत दमबाजी केली. ...

Don't go for less that your full potential | कंत्राटांसाठी जम्बोची यंत्रणा वेठीस धरू नका

कंत्राटांसाठी जम्बोची यंत्रणा वेठीस धरू नका

पुणे : पालिकेतील विरोधी पक्षांच्या काही गटनेत्यांनी जम्बो कोविड रुग्णालयात जाऊन डॉक्टर, कर्मचारी आणि व्यवस्थापनाला हिशेब मागत दमबाजी केली. हा सर्व प्रकार कंत्राटासाठी केला जात असून, फायद्यासाठी जम्बोची यंत्रणा वेठीस धरू नका. कंत्राटापेक्षा रुग्णांचे जीव महत्त्वाचे असल्याची टीका महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली.

पालिकेतील काही गटनेत्यांनी शुक्रवारी जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन गदारोळ केला. तेथील यंत्रणा वेठीस धरून तुमची बिले कशी निघतात तेच पाहतो, आम्हाला खर्चाचे हिशोब दाखवा, आम्हाला आत्ताच्या आत्ता जम्बोची पाहणी करायची आहे अशा प्रकारे धमकावणी केल्याची तक्रार व्यवस्थापन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी महापौर, सभागृह नेते, पालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

याविषयी बोलताना महापौर म्हणाले, झालेला प्रकार चुकीचा असून जम्बोमधील डॉक्टर, कर्मचारी, एजन्सी यांनी सर्वांची भेट घेतली. सध्याची परिस्थिती अत्यंत विपरीत आहे. मागील वर्षापासून पालिकेची सर्व यंत्रणा सलग २४ तास काम करत आहे. कोरोना परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी जाऊन दमबाजी करायची, हिशेब मागायचे याचे भान ठेवायला हवे. कोणाही पक्षाचे नगरसेवक असले तरी त्यांच्याकडून ही चूक अपेक्षित नाही. या काळात यंत्रणांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. सूचना अवश्य केली जावी. पण धमकावणे चूक आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले की, शुक्रवारी झालेल्या गोंधळात भाजपाचा एकही नगरसेवक सहभागी नव्हता. सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद झाला आहे. विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी भान ठेवणे आवश्यक आहे. आम्ही राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करतोय. पुणेकरांची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. केवळ कंत्राट मिळविण्यासाठी यंत्रणा वेठीला धरली जात आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. हा काळ एकीने वागण्याचा आहे.

Web Title: Don't go for less that your full potential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.