मुलांमध्ये मधुमेह, दम्यासारख्या व्याधी असल्या, तरी घाबरू नका.!. ही काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:44+5:302021-04-25T04:10:44+5:30
पुणे : कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी विशेषत: 11 वर्षांपुढील मुलांसाठी घातक ठरत आहे. ज्येष्ठांप्रमाणेच स्थूलता, उच्च रक्तदाब, ...

मुलांमध्ये मधुमेह, दम्यासारख्या व्याधी असल्या, तरी घाबरू नका.!. ही काळजी घ्या
पुणे : कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी विशेषत: 11 वर्षांपुढील मुलांसाठी घातक ठरत आहे. ज्येष्ठांप्रमाणेच स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि दमा यांसारख्या व्याधी असलेल्या मुलांना कोरोनाच्या संसर्गासापासून दूर कसे ठेवायचे? या चिंतेने पालकांना ग्रासले आहे. सध्या विषाणूचे संक्रमण अधिक वेगाने होताना दिसत आहे. 18 वर्षांखालील मुलांसाठी लसीकरण नसल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मुलांची काळजी कशी घ्यायची? असा प्रश्न पालकांना पडला आहे. मात्र, व्याधी असलेल्या मुलांच्या पालकांनी घाबरून जाऊ नये, फक्त काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांनी कितीही हट्ट केला, तरी मुलांना सोसायटीमध्ये खेळायला जाऊ देऊ नये, तरी गेल्यास जेव्हा मूल बाहेरून घरी येईल तेव्हा वारंवार हात धुणे आणि कपडे बदलणे. याव्यतिरिक्त, कोणालाही घरात संसर्ग झाल्यास, मुलांना त्या खोलीत जायला प्रतिबंध करणे या गोष्टी पाळल्या जाणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये मुलांमध्ये ताप, खोकला, अतिसार, उलट्या होणे, ओटीपोटात वेदना, जास्त ताप, सर्दी आणि आहारातील कमतरता लक्षणे प्रामुख्याने दिसत आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करता कामा नये. विशेषत: ज्या मुलांना स्थूलता, रक्तदाब, मधुमेह आणि दमा यांसारख्या व्याधी आहेत त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्थूलतेमुळे मुलांना चालल्यास किंवा पळल्यास दम लागतो. अशावेळी त्यांची ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजनची पातळी तपासून पाहाणे आवश्यक आहे. दरम्यान, मधुमेही आणि इन्सुलिन घेणाऱ्या मुलांना संसर्गाचा धोका अधिक असतो. मधुमेही मुलांना सोसायटीच्या मुलांबरोबर खेळायला पाठवू नये असा सल्ला देखील मधुमेह तज्ज्ञांनी दिला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुलांमध्ये स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि दमा या व्याधी आहेत. मात्र, मुलांसाठी अजून तरी लस उपलब्ध नसल्यामुळे हे आजार नियंत्रित ठेवले तर कोणताही धोका नाही. मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असला, तरी स्थिती गंभीर म्हणावी इतकी नाही. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर हा अनिवार्य आहे. मुलांना घेऊन कोणताही प्रवास करू नका. मुलांना कंटाळा आलाय म्हणून त्यांना बाहेर घेऊ जाऊयात, हे टाळा. मुलांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला तर कोणतेही औषधं नाही हे लक्षात ठेवा. मुलांमधील स्थूलत्व व्ययामाने कमी करा. जंकफूड देणे बंद करा. आहारात सी व्हिटॅमिनचा वापर करा- डॉ. जयंत नवरगे, बालरोगतज्ज्ञ
--------------------------------------------------------------
लहान मुलांमधला मधुमेह हा गंभीर स्वरूपाचा असतो. विशेषत: इन्सुलिनचे औषध घेणा-या मुलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण दिवसातून पाच ते सात वेळा तपासावे लागते. त्यांची साखर नॉर्मल ठेवावी लागते. जी नियंत्रणात ठेवणे खूपच आव्हानात्मक असते. मधुमेही मुलगा इतर मुलांच्या संपर्कात आला तर त्याला तत्काळ लागण होऊ शकते. मधुमेही आणि इन्सुलिन घेणाऱ्या मुलांना संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे-
डॉ. संजय गांधी, प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ
-------------------------------------------------------------------------------------------------