कोरेगावला बँकेवर दरोड्याचा प्रयत्न
By Admin | Updated: February 2, 2015 00:01 IST2015-02-02T00:01:04+5:302015-02-02T00:01:04+5:30
खिडकीचे गज व स्टॉकरूमचा लोखंडी दरवाजा तोडून येथील स्टेट बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केला. परंतु सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले.

कोरेगावला बँकेवर दरोड्याचा प्रयत्न
कोरेगाव भीमा : खिडकीचे गज व स्टॉकरूमचा लोखंडी दरवाजा तोडून येथील स्टेट बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न केला. परंतु सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३१) रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना दोन जणांना सायरनचा आवाज आला. त्यांनी वढू चौकात रात्रीच्या गस्तीसाठी तैनात असलेले हवालदार कांबळे यांना सदर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कांबळे यांनी पोलीस पाटील मालन गव्हाणे यांना सूचना देऊन बँकेजवळ जाऊन तपासणी केली. बँकेच्या आतील सायरन तुटल्याचे निदर्शनास आले. नंतर बँकेच्या स्टॉकरूमची पाहणी केली असता, स्टॉकरूमचा लोखंडी दरवाजाचा कोयंडा ब्लेडने कापून आतला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. चोरट्यांनी सर्व्हर रूममध्ये प्रवेश केल्याने सायरन वाजला.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी आपल्या पथकासह बँकेत येऊन पाहणी केली. बँकेच्या शाखा व्यवस्थापिका रिना रजपूत आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात एकच चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचे त्यांना दिसले.
दरम्यान, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी पोलीस कंट्रोल नंबरवर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांना मिळताच त्यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळाला भेट दिली. यानंतर बँकेच्या परिसराची पाहणी केली असता चोरट्यांनी वापरलेले हातमोजे, ब्लेड, डोक्याची हिवाळी टोपी, कटावणी आदी साहित्य मिळून आले. (वार्ताहर)