डॉक्टरांची दिवाळी दवाखान्यात

By Admin | Updated: October 27, 2014 03:17 IST2014-10-27T03:17:04+5:302014-10-27T03:17:04+5:30

कीकडे राज्यभर दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना, पुण्यात मात्र, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने पुणेकरांच्या दवाखाने व रुग्णालयांमध्ये रांगा लागल्या होत्या

Doctor's Diwali Hospital | डॉक्टरांची दिवाळी दवाखान्यात

डॉक्टरांची दिवाळी दवाखान्यात

पुणे : एकीकडे राज्यभर दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना, पुण्यात मात्र, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने पुणेकरांच्या दवाखाने व रुग्णालयांमध्ये रांगा लागल्या होत्या. यामुळे यंदा रुग्ण तपासणीसाठी डॉक्टरांना दिवस-रात्र दवाखाने, रुग्णालयांमध्येच बसण्याची वेळ आल्याने डॉक्टरांना दिवाळी सण साजरा करता आला नाही.
शहरात डेंग्यूच्या उद्रेकापाठोपाठ संसर्गजन्य आजारांनी हातपाय पसरले आहेत. यामध्ये सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, घसादुखी आदी आजार आहेत. पुणेकर संसर्गजन्य आजाराच्या कचाट्यात सापडल्याने ते डॉक्टरांकडे धाव घेत आहेत.
दिवसाला विषाणूजन्य ताप आणि डेंग्यूचे अनेक रुग्ण दवाखान्यात येत असताना दिवाळीची सुटी घेणे योग्य नाही, अशी भावनाही डॉक्टरांनी व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात खासगी असल्याने त्यांना वर्षभर सुट्या नसतात. तसेच डॉक्टरांचे काम तणावपूर्ण असल्याने अनेक डॉक्टर दिवाळीची आवर्जून सुटी घेतात आणि बाहेरगावी जाणे पसंत करतात. तर काही जण कुटुंबाबरोबर राहून दिवाळीचा आनंद लुटतात. परंतु सध्या शहरातील वाढते आजार आणि साथीचे रोग ही परिस्थिती पाहून सुटी घेणे शक्य नसल्याने दिवाळीच्या दिवसातही शहरातील अनेक दवाखाने सुरू होते. याबरोबरच मेडिकलच्या दुकानातही औषधे घेण्यासाठी मोठी गर्दी असल्याने फार्मासिस्टनाही दिवाळीच्या सणाचा आनंद लुटता आलेला नाही.
याबाबत फॅमिली फिजिशियन डॉ. सुहास आळेकर म्हणाले, की यंदा शहरात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे दिवाळीतही आम्हाला दुर्दैवाने दवाखाने बंद ठेवता आले नाहीत आणि आमची दिवाळी दवाखान्यांमध्येच गेली. वातावरणातील बदल, वाढते प्रदूषण आणि शहरात वाढणारी अस्वच्छता या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार होण्याची गरज आहे. पुढील काळात हा विचार न झाल्यास अनेक साथी आपले डोके वर काढू शकतात. त्यामुळे स्वच्छतेची काळजी प्रत्येक रुग्णाने घेणे गरजेचे आहे. तसेच शहरातील या परिस्थितीकडे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानेही दुर्लक्ष केल्याने आजारांचे प्रमाण वाढत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor's Diwali Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.